यशस्वी मराठी उद्योजकांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या मराठी उद्योजकांचा जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिजच्या वतीने ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात हा पुरस्कार सोहळा आज पार पडला.

जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि कार्याध्यक्ष शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. अनंत इंटरप्रायझेसच्या शीला धारिया, दुबईतील अब्दुल्ला ऍण्ड असोसिएटस्चे संस्थापक अशोक वर्तक, कान्हाज मॅजिक प्रॉडक्शन हाऊसचे संस्थापक अभिनेते सुबोध भावे, श्रीनिवास इंजिनीयरिंग ऑटो कॉम्पोनन्टस्चे संस्थापक गिरीधर काळे, बडवे ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे आणि उद्योजक सुरेश महाजन यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठी माणसाने नकारात्मक विचार न करता मनापासून उद्योगात उतरून यशस्वी होण्यासाठी जिद्दीने मेहनत केली पाहिजे आणि यश मिळाल्यानंतर इतर मराठी माणसांनाही मोठे करण्यासाठी योगदान दिले पाहिजे असे याप्रसंगी मनोहर जोशी म्हणाले. मराठी माणसाची उद्याची पिढी उद्योजक होण्यासाठी सक्षम करण्यास जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिज कटिबद्ध असल्याचे यावेळी शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर श्रद्धा जाधव, उद्योजक डॉ. विजय ढवळे, स्थापत्य समिती अध्यक्ष प्रीती पाटणकर, अभिनेते महेश कोठारे यांच्यासह चेंबरचे पदाधिकारी परशुराम पाटील, प्रकाश चिखलीकर, संतोष कामेरकर, सुधीर सामंत आदी उपस्थित होते.