
जर एखादी गोष्ट पूर्ण करायचं ठरवलं तर त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी हवी. राजस्थानमधील एका गरीब कुटुंबातील तरुणाने आयएएस अधिकारी होण्याचं पाहिलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरवलं. राजस्थानमधील बापी नावाच्या गावातील राम भजन कुम्हारा या तरुणाने लहानपणी पाहिलेलं आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केले. रामचा प्रवास खूपच आव्हानात्मक होता. राम आपल्या आईसोबत रोजंदारीवर दगड फोडण्याचे काम करायचा. यासाठी रामला केवळ 5 ते 10 रुपये मिळायचे, परंतु रामने कष्टासोबतच मन लावून अभ्यास केला. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत देशात 667 वा रँक मिळवत आयएएस अधिकारी झाला. रामची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरात एका जेवणासाठीसुद्धा पुरेसे पैसे नसायचे. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा उपाशी झोपण्याची वेळ आली. कोरोना काळात परिस्थिती आणखी बिकट झाली. कोरोना काळात वडिलांना दम्याचा त्रास झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वडील गेल्यानंतर रामला आणि त्याच्या आईला मजूर म्हणून काम करावे लागले.
हवालदाराची नोकरी मिळवली
रामने रोजंदारीवर काम करत असताना अभ्यासात मात्र खंड पडू दिला नाही. परीक्षा देत राहिला. कठोर परिश्रमानंतर अखेर रामला दिल्ली पोलीस मध्ये हवालदाराची नोकरी मिळाली. नोकरी मिळाली असली तरी रामने आयएएस अधिकारी होण्याचे पाहिलेले स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. तो दिवसा नोकरी आणि रात्री अभ्यास करायचा. अखेर आठव्या प्रयत्नात रामने 2022 मध्ये आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

























































