महाराष्ट्रात दररोज 27 हजार मेगावॅट विजेचे यशस्वी वितरण; ना वीजनिर्मितीत खंड, ना वीज वितरणात 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

19 हजार मेगावॅट विजेची मागणी पूर्ण करताना गुजरात ऊर्जा विकास निगम चाचपडत असतानाच महाराष्ट्रात मात्र गेल्या 15 दिवसांपासून तब्बल 27-28 हजार मेगावॅट एवढी विक्रमी मागणी नोंदली जात असून ती यशस्वीपणे पूर्ण केली जात आहे. चढलेला तापमानाचा पारा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे विजेच्या मागणीत सुमारे तीन-साडेतीन हजार मेगावॅट वाढ झाली आहे. ती पूर्ण करताना ना वीजनिर्मितीत खंड पडला आहे, ना वीज वितरणात.

महावितरणकडून मुंबई वगळता राज्यभरात वीज वितरण केले जात असून गेल्या मार्चच्या पहिल्या 15 दिवसांत दररोज सुमारे 21 हजार मेगावॅटच्या जवळपास विजेची मागणी नोंदली जात होती, तर मुंबईत 2800 मेगावॅट एवढी असायची. पण गेल्या 15 दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात मागणी नोंदली जात आहे. 24 मार्च रोजी महावितरणकडे राज्यभरातून 24 हजार 400 मेगावॅट तर तर मुंबईतील वीज वितरण कंपन्यांकडे 3200-3500 मेगावॅट एवढी नोंदली होती. 30 मार्च रोजी महावितरणकडे 24 हजार 79 मेगावॅट तर 31 मार्च रोजी 24 हजार 205 मेगावॅट विजेची मागणी नोंदली आहे. ही विक्रमी मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून 8 हजार मेगावॅट, खासगी वीज कंपन्यांकडून 8-9 हजार मेगावॅट तर केंद्रीय वीज प्रकल्प, सेंट्रल सेक्टर, पॉवर एक्स्चेंजमधून 7 हजार मेगावॅट वीज घेतली जात आहे. तर मुंबईची मागणी पूर्ण करण्यासाठी  टाटा पॉवरकडून सुमारे दीड हजार मेगावॅट, अदानीकडून पाचशे मेगावॅट, तर केंद्रीय प्रकल्प, एक्स्चेंजमधून गरजेनुसार दीड हजार मेगावॅटपर्यंत वीज घेतली जात आहे.

महानिर्मितीला कोळशाचे नो टेन्शन

विजेची मागणी वाढल्याने औष्णिक वीज प्रकल्पांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र महावितरणला वीज पुरवठा करणाऱया महानिर्मितीला कोळसाटंचाईचे टेन्शन नाही. महानिर्मितीच्या औष्णिक वीज प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता सुमारे 9 हजार मेगावॅट असून त्याला पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यासाठी दिवसाला 1 लाख 20 हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. मात्र कोळसा खाणीतील कामगार देशव्यापी संपात सहभागी झाल्याने कोळशाचा साठा सहा लाख 20 हजार मेट्रिक टनापर्यंत खाली आला होता. मात्र ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या नियोजनामुळे  गेल्या तीन दिवसांपासून दररोज कोळशाचा पुरवठा 1 लाख 30 हजार मेट्रिक टनापर्यंत वाढला असून महानिर्मितीकडील एकूण साठा 6 लाख 80 हजार मेट्रिक टनापर्यंत वाढला आहे. तसेच भुसावळ आणि परळी वीज केंद्र वगळता इतर पाच वीज केंद्रांवर सरासरी पाच दिवस पुरेल एवढा कोळसा उपलब्ध आहे.