पारंपरिक शेतीला कंद पीक लागवडीचा पर्याय उपलब्ध, दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांची यशस्वी चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणातील पारंपरिक शेतीला आता कंद पीक लागवडीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठातील संशोधकांनी एका यशस्वी प्रायोगिक चाचणीद्वारे हे सिद्ध करून दाखवले आहे.

कोकणातील शेतकरी आंबा, काजू आणि भातशेतीबरोबरच कंद पिकाच्या लागवडीकडे वळत असून यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काही शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर कंदपीक लागवड ग्राम बिजोत्पादन प्रयोग राबवून यशस्वी करून दाखवले आहे. कमीत कमी जागेत अधिक उत्पन्न घेता येते तसेच कंद पिकांच्या बियाण्यांची विक्रीसुद्धा उत्तम होऊ शकते हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

खेड तालुक्यातील कळंबणी, सुकीवली, दापोली तालुक्यातील सडवे, शिवाजीनगर, वाकवली, शिवाजीनर येथील शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेऊन बियाणे आणि कंदपिकांची बियाणे विक्री केली आहे. खेड तालूक्यातील सुकीवली येथील सूर्यकांत शंकर धाडवे ,सडवे येथील रमेश महादेव टेमकर या शेतक-यांनी केवळ 2 गुंठयात 335 किलो, वाकवली येथील राजाराम धोंडू शिगवण यांनी 1 गुंठ्यात 215 किलो इतके भरघोस उत्पादन घेतले आहे.

कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत सुरू असलेल्या वाकवली येथील अखिल भारतीय समन्वित कंदपिके योजनेमध्ये कोकणात होणा-या विविध कंदपिकांवर संशोधन चालू आहे. या प्रकल्पाच्या संशोधनातून कणघर, रताळी, अळू, पोरकंद आदी कंद पिकाच्या विविध जाती विकसित केल्या आहेत. तसेच विविध पिकांच्या लागवड पद्धती प्रमाणित करून त्याचीही शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे. कंद पिकाच्या लागवडीसाठी कट/ रोपे/ खोड याची मागणी आता वाढत आहे.

शेतकऱ्यांच्या या वाढत्या मागणीप्रमाणे त्यांना लागवडीसाठी आवश्यक कंदांचा, रोपांचा पुरवठा करण्यासाठी बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेणे आवश्यक होते. याकरिता कोकण कृषी विद्यापीठ प्रक्षेत्रावर बिजोत्पादनाच्या मर्यादा लक्षात घेता गतवर्षीच्या संशोधन समितीच्या बैठकीमध्ये यावर उपाययोजना सुचवण्यासाठी चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालिन संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी काही कंदपिकांचे उत्पादन गावपातळीवर काही निवडक शेतकऱ्यांमार्फत घेण्यात यावे, असे सुचविले होते. त्याप्रमाणे कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागामार्फत खेड तालुक्यातील कळंबणी व सुकीवली तसेच दापोली तालुक्यातील सडवे, वाकवली, दापोलीतील शिवाजीनगर या गावामध्ये सुरण या कंदपिकाचे ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम घेऊन कंदपिकाचे ग्रामबिजोत्पादन विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच घेण्यात आले.

कंदपिकाचा आयुर्वेदातही मोठा उपयोग असून सुरणासारख्या कंदपिकाला नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये मोठी मागणी आहे तसेच हे कंदपीक प्रक्रिया उद्योगात पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाते तसेच या कंद पिकांना एक्सपोर्टसाठी मोठी मागणी आहे, अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कंदपीक योजनेच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा गुडदे यांनी बोलताना दिली.