
सामना प्रतिनिधी । पारनेर
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तालुक्यातील कळस येथे एकनाथ दगडू मधे (रा. खडकवाडी) हे उसतोडणी मजूर गंभीर जखमी झाले. अळकुटी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर त्यांना नगर येथे पुढील उपचारासाठी हालविण्यात येणार आहे.
गेल्या आठ दिवसांपासून कळस येथील चंद्रभान रामकृष्ण राणे यांच्या शेतामध्ये उसतोडणीचे काम सुरू आहे. उसतोडणी अखेरच्या टप्प्यात आल्याने एकनाथ मधे यांच्यासह वालीबा शिंगवे, रूमा दुधवडे, मच्छिंद्र दुधवडे, केशव जाधव, विजय दुधवडे, बापू जाधव, नाना जाधव यांनी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उस तोडणीस सुरूवात केली. थोडाच उस शिल्लक राहिल्याने चोहोबाजूंनी सर्व मजूर उसतोडणी करीत होते. शिल्लक उसामध्ये दबा धरून बसलेल्या बिबटयाला त्याच्यावर चोहोबाजूंनी आक्रमण होत असल्याची चाहूल लागताच त्याने उसाबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला. तो ज्या बाजूने बाहेर आला तेथे एकनाथ मधे हे उस तोडणी करीत होते. मधे दिसात बिबटयाने त्यांच्या अंगावर झेप घेत त्यांच्या हातापायांना चावा घेण्यास सुरूवात केली. त्यांच्या डोक्यास, कपाळास चावा घेतल्याने ते काही क्षणात रक्तबंबाळ झाले. बिबट्याच्या हल्ल्यामुळे मधे गांगारून गेले. बिबट्या हल्ला करीत असल्याचे इतर मजूरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरूवात केली. ते पाहून मात्र बिबटयाने तेथून पळ काढला.
स्थानिक नागरीकांनी मधे यांना तातडीने अळकुटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पंचायत समितीच्या सदस्या रोहीणी काटे यांचे पती संतोष काटे यांनी आरोग्य अधिकारी तसेच वन विभागाच्या आधिका-यांना या दुर्घटनेची माहीती दिली. मधे यांच्यावर आरोग्य केंद्रात तात्काळ उपचार करण्यात आले असून आता त्यांच्यावर नगर येथे उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट देउन घटनेबाबात वरीष्ठ अधिका-यांना माहीती दिली. पंचनामा करण्यात येउन मधे यांच्यावरील पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात येउन त्यांना आर्थिक मदतही वनविभागाकडून देण्यात येणार असल्याचे संतोष काटे यांनी सांगितले.
























































