गाळप हंगाम तोंडावर; ऊसतोडणी दराचा तिढा सुटेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊसतोडणी कामगारांच्या तोडणीदरात वाढ करावी, मुकादमाचे कमिशन वाढावे, यांसह इतर मागण्यांसाठी यंदा राज्यात ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. संप करत असल्याची घोषणा करून दोन महिने झाले. गाळप हंगाम सुरू होण्याच्या तयारीत आहे. मात्र, दोनवेळा बैठक होऊनही अजूनही दरवाढीबाबत तोडगा निघाला नाही. संप कधी मिटणार? याबाबत नेमकी माहिती मिळत नसल्याने मजुरांत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, आठ दिवसांत तोडगा निघेल, अशी आशा ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी व्यक्त करत आहेत.

राज्यातील बीड, नगर, जालना, धाराशिव, नंदुरबार, जळगाव, चाळीसगाव भागात मजुरांची संख्या अधिक आहे. मजुरांच्या दरवाढीबाबत दर तीन वर्षांनी करार केला जातो. यापूर्वी 2015 साली करार झाला होता. त्यावेळी तीनऐवजी पाच वर्षांचा करार झाला. आता तो करार संपला आहे. त्यामुळे यंदा नव्याने करार करून मजुरांना दुप्पट दरवाढ द्यावी, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, यांसह अन्य मागण्यांसाठी ऊसतोड कामगार संघटनांनी संप पुकारत असल्याचे दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले. याच मुद्दय़ावर साखर संघाचे पदाधिकारी, संचालक व ऊसतोड मजूर संघटनांच्या प्रतिनिधींची दोन वेळा बैठक झाली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नाही.

दरवर्षी 1 ते 15 ऑक्टोबर या काळात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत असतो. राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी बॉयलर प्रदिपन करून कारखाने सुरू केले आहेत. मात्र, एखादा अपवाद वगळता तोडणी मजूर कारखाना कार्यस्थळावर आलेले नाहीत. ‘मजुरांची दरवाढ झाल्याशिवाय कोयता हातात घेणार नाही’, असा सगळ्याच संघटनांनी इशारा दिला आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश धस यांनी राज्यभर बैठका घेऊन संप अधिक तीव्र केला. त्यामुळे ज्या मजुरांनी कारखान्यावर जायचा प्रयत्न केला, त्यांची वाहने अडवली जात असल्याने मजूर घर सोडायला तयार नाहीत. मात्र, संपावर तोडगा कधी निघणार, याबाबत माहिती मिळत नसल्याने उसतोड मजुरांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

दरम्यान, आठ दिवसांत मजुरांच्या दरवाढीवर तोडगा निघण्याची आशा ऊसतोडणी कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यंदा उसाचे

ऊसतोडणी कामगारांना त्यांच्या कष्टाच्या तुलनेत किमान दुप्पट दरवाढ मिळावी, यासाठीच संप पुकारला आहे. दरवाढीसह अन्य मागण्यांसाठी दोनवेळा बैठक झाली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच होणाऱया बैठकीत समाधानकारक तोडगा निघेल, अशी आशा आहे.

– गहिनीनाथ पाटील-थोरे, अध्यक्ष, राज्य ऊसतोडणी मजूर-मुकादम युनियन.क्षेत्र अधिक असल्याने ऊसतोडणीला लवकर सुरुवात झाली नाही, तर ऊसउत्पादक शेतकऱयांसह कारखानदारांची अडचण होण्याची शक्यता आहे.