
राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू होवून 1 महिना होतोय तोपर्यंत वातावरणातील बदलामुळे पडत असलेल्या अवकाळी पावसाने ऊस गाळपास मोठी अडचण निर्माण झाली आहे. पावसामुळे शेतात ऊसतोड करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतातून ऊसाची आवक बंद झाल्याने तसेच कारखान्यातील बॅग भिजल्याने ऊसाचे गाळप बंद करण्याची वेळ कारखान्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांसह कारखान्याकडे ऊस तोडीसाठी आलेल्या ऊस तोडणी मजूर व त्यांच्या कुटूंबांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर तोडणी मजूरांची जवळपास 1000 कुटूंबे खोप करून राहत आहेत. मध्यरात्री पडलेल्या पावसाचे पाणी त्यांच्या खोपीमध्ये शिरून, अन्न धान्य, कपडे यांसह घरगुती साहित्य भिजून गेले. कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यस्थळावरील यशवंतराव चव्हाण विद्यालय, हनुमान मंदिर, विठ्ठल रूक्मिणी मंदिर, साखर शाळा इमारत आदि ठिकाणी या मजूरांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना तातडीने खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले आहे.
कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या सहकार्याबाबत ऊसतोडणी मजूर व त्यांच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. पुन्हा एकदा कारखान्याकडून सामाजिक बांधिलकी जोपासत, मानवतेचे दर्शन झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, मुख्य शेती अधिकारी मोहनराव पाटील, उप शेती अधिकारी नितीन साळुंखे, ऊस विकास अधिकारी, केनयार्ड सुपरवायझर यांचेसह शेती विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.


























































