सुटाबुटातला साहेब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सूर्य भकाभका आग ओकत होता. एरवी एसीत बसून गर्मी जाणवत नाही, पण आज दुपारीच बाहेर पडल्यामुळे उन्हाची तीव्रता जास्त जाणवत होती.

रस्त्यात उन्हाच्या काहिलीत बाजूने जाणारे कुणीतरी दोघे सुटाबुटातले आणि त्यांच्यासोबत चालणाऱया दोन ऑफिस सहकारी पाहिल्या. एकीने तसाच काळय़ा रंगाचा सूट घातलेला, तर दुसरी साध्या ड्रेसमध्ये होती. एका ऑफिसमधून निघून जवळच दुसरीकडे कुठेतरी मीटिंगसाठी जात असावेत. कारण त्यांच्या हातात नुसत्याच फायली होत्या. भयंकर घामाघूम झालेले. कधी कधी मनात येतं  की, असला युरोपियन साहेबी थाट आपल्याकडे आवश्यक आहे का? मीटिंग अशाच अटेंड कराव्या लागतात म्हणे… असा अट्टाहास का? आपला स्वतःचा असा मीटिंगसाठी पेहराव का नाही?

जरी ती मीटिंग फॉरेनच्या कामकाजाबाबत असेल फॉरेनर्ससोबत असेल तरी आपण आपला पेहराव का घालू नये. आपल्या वातावरणात ते आपल्यासाठी सुसंस्कृतपणाचे आणि स्वाभिमानाचेही ठरेल.

जरा लक्षात घेतले तर सगळेच मान्य करतील की, युरोपात थंड वातावरण आहे. तिथे जाडेभरडे, काळे कपडे, गळाबंद सूट-टाय चालू शकते. पायात मोजे, बूट असा जामानिमा तिथे चालू शकतो.

थंड वातावरणात ऊब मिळविण्याकरिता स्वतःला आत जखडून घेणे त्यांना सोयीचे वाटत असल्यामुळे तोच त्यांचा पारंपरिक पेहराव झाला. याशिवाय सॅनिटरी पॉट ही संकल्पनासुद्धा तिथूनच आली. अंगभर कपडे, बूट-चपला घालूनच टॉयलेटचा वापर करणे तसेच वातावरण थंड म्हणून पाण्याऐवजी टिश्यू पेपरचा वापर करणे, या सगळय़ा गोष्टी पाहिल्या की, लक्षात येईल, ती त्यांची गरज आहे.

तिथला तो चपराशी असला तरी त्याचा पेहराव आणि आचरण त्याच गटातले.

गोरा साहेब आपल्याकडे आला, आपण त्याला परतवून लावले तरी तो आपली छाप सोडून गेला आणि आपल्या मनात कायम कोरले गेले, ‘साहेब असणे म्हणजे असे दिसणे, असे राहणे, असे वागणे!’

पेहरावाने इथल्या वातावरणात आपण घामाघूम झालो तरी चालेल, पण साहेबी थाट असाच हवा.

असा कधी घामाघूम होऊन आलेला सुटाबुटातला माणूस दिसला की, त्याला विचारावेसे वाटते,

‘‘बाबा रे, आपल्याकडे उष्ण वातावरणात हे हवंय कशाला? आपला सुती पेहराव काय वाईट आहे?’’

>> सुहास मळेकर