
मालवणी येथे इस्टेट एजंटने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इसराल जलील खान असे मृताचे नाव आहे. आर्थिक कारणास्तव नैराश्यात त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इसराल हा मालवणी येथे राहत होता. त्याने काही दिवसांपूर्वी एका रूमचा सौदा केला होता. त्यामध्ये त्याला 19 लाख रुपये मिळाले होते. ते पैसे त्याने काही ठिकाणी गुंतवले होते, मात्र तो सौदा अचानक रद्द झाला. सौदा रद्द झाल्यानंतर तिघांनी त्याच्याकडे 19 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने कसेबसे 10 लाख रुपये परत केले. उर्वरित 9 लाख रुपयांसाठी तीन जण त्याच्याकडे पैशाबाबत विचारणा करायचे. त्यामुळे शुक्रवारी त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली. शनिवारी रात्री तीन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.































































