शेतकरी दाम्पत्याने घेतली विहिरीत जलसमाधी

सामना प्रतिनिधी । मोताळा (जि.बुलढाणा)

कर्जमाफी यादीत नाव आहे, पण अद्याप कर्जमाफी मिळाली नाही म्हणून तालुका ठिकाण असलेल्या मोताळा शहरातील वार्ड नंबर १४ येथील शेतकरी दाम्पत्याने घराशेजारच्या विहिरीत उडी घेऊन जलसमाधी घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजता घडली.

जिल्ह्यातील मोताळा येथील रहिवाशी शेतकरी रमेश सावळे व विद्या सावळे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांच्याकडे बँकेचे कर्ज होते. कर्जमाफी यादीत नाव असूनही अद्याप कर्जमाफी न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीत ते सापडले होते. दुसर्‍या बँकेचे कर्जही मिळत नव्हते. यामुळे दोघा नवरा-बायकोमध्ये नेहमी भांडणे होत होती. गुरुवारी रात्री देखील त्यांच्या कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात घराशेजारी असलेल्या विहिरीत रात्री ९.३० च्या सुमारास दोघांनी उड्या घेतल्या. त्यातच त्यांना जलसमाधी मिळाली, अशी माहिती मृतकाच्या नातेवाईकांनी दिली आहे.

या दाम्पत्याला तीन वर्षाचा मुलगा आहे. तो आता पोरका झाला आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर एकाच चितेवर मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. या आत्महत्येमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. हे सरकार आणखी किती शेतकर्‍यांचे बळी घेणार आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.