1962 पासून नॉनस्टॉप मतदान, तेराव्यांदा मतदान करण्यास उत्सुक

326

सुमित्रा बोडस या शिक्षिका होत्या. सुदैवाने त्यांना कधी निवडणुकीची डय़ुटी लागली नाही. त्यामुळे मतदान हुकण्याची त्यांच्या आयुष्यात कधी वेळ आली नाही. मतदान हे आपले कर्तव्यच असल्याने त्या मतदानाचा हक्क बजावत राहिल्या. विशेष म्हणजे त्यांनी दिलेले मत कधीही फुकट गेलेले नाही, असेही त्या मिश्कीलपणे सांगतात.

रत्नागिरीतील 83 वर्षांच्या सुमित्रा बोडस यांनी आतापर्यंत बारावेळा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले आहे. 21 ऑक्टोबरला तेराव्यांदा मतदान करण्यास त्या उत्सुक आहेत. म्हणजेच 1962 पासून आतापर्यंत सर्वच्या सर्व विधानसभा निवडणुकीमध्ये सुमित्रा बोडस यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानादिवशी सकाळी साडेसात वाजता पहिल्यांदा मतदान करण्याचा पायंडा यंदाही त्या कायम ठेवणार आहेत.

आरोप करण्यापेक्षा मतदान करा!

सुमित्रा बोडस यांचे आजोबा नानासाहेब देवगिरीकर हे खासदार असल्यामुळे सुमित्रा बोडस यांचा लहानपणापासूनच राजकारणाशी संबंध आला होता. देवगिरीकर हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यामुळे ते निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होत. त्यावेळी भिंती रंगवणे, ताई, माई, आक्का म्हणत प्रचार करण्याच्या प्रथा सुरू होत्या. 1962 साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा मतदान कोल्हापूर येथे केले. त्यानंतर त्या रत्नागिरीत आल्या. 1967 च्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी रत्नागिरीमध्ये सलग 11 वेळा मतदान केले. 21 ऑक्टोबरला होणाऱ्या 13 व्या निवडणुकीचे मतदान करण्यासाठी त्या उत्सुक आहेत.

सुमित्रा बोडस यांनी पूर्वीच्या आणि आताच्या निवडणुकीतील बदलाबाबत आपले अनुभव सांगितले. आजोबा खासदार असल्यामुळे आमचा निवडणुकीशी थेट संबंध यायचा. आम्हीही प्रचारात सहभागी व्हायचो. त्यावेळी आतासारखा प्रचार नव्हता. भिंती रंगवल्या जायच्या. कर्ण्यावरून ‘ताई, माई, आक्का’ करून प्रचार करायचो. त्यावेळी निवडणुकीसाठी फारसे नियम नव्हते असेही त्यांनी सांगितले.

वयाच्या 83 व्या वर्षीही
21 ऑक्टोबरला मतदान करण्यासाठी त्या उत्सुक आहेत. मतदारांना मतदान करा हे सांगण्यापेक्षा मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सुक असले पाहिजे असे त्यांना वाटते. आतापर्यंत त्यांनी
16 लोकसभा निवडणुकांमध्ये, 12 विधानसभा निवडणुकांमध्ये, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या सात निवडणुकांमध्ये त्यांनी मतदान केले. अशा आतापर्यंत त्यांनी 35 निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

आपली प्रतिक्रिया द्या