
हिंदुस्थानचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री याने बुधवारी रात्री झालेल्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमधील लढतीत ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या 77 आंतरराष्ट्रीय गोलांना मागे टाकले. सुनील छेत्री याने 62 व 71व्या मिनिटाला गोल करीत आपली आंतरराष्ट्रीय गोलांची संख्या 79वर नेली. हिंदुस्थानने या लढतीत मालदीवला 3-1 अशा फरकाने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदाच्या लढतीत हिंदुस्थानी संघासमोर नेपाळचे आव्हान असणार आहे. दोन देशांमध्ये 16 ऑक्टोबरला ही लढत रंगणार आहे.
साखळी फेरीत अव्वल स्थानावर
सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपच्या पहिल्या दोन लढतींमध्ये प्रतिमेला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या हिंदुस्थानी संघाने पुढील दोन लढतींमध्ये झोकात पुनरागमन केले. बांगलादेश व श्रीलंका यांच्यासोबत बरोबरीत समाधान मानावे लागल्यानंतर हिंदुस्थानने नेपाळ व मालदीव यांना पराभूत करीत साखळी फेरीत आठ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. नेपाळने सात गुणांसह दुसरे स्थान पटकावले. मालदीवला सहा, बांगलादेशला पाच व श्रीलंकेला एक स्थानावरच समाधान मानावे लागले.
आठव्या जेतेपदाची आस
हिंदुस्थानने या स्पर्धेची सर्वाधिक सात जेतेपदे पटकावली आहेत. पण 2015 सालानंतर हिंदुस्थानला या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. मालदीवने 2018 साली हिंदुस्थानला हरवत दुसऱयांदा ही स्पर्धा जिंकली होती. हिंदुस्थानचा संघ 16 ऑक्टोबरला आठव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील. नेपाळ मात्र पहिल्यांदाच या स्पर्धेच्या विजेतेपदावर मोहोर उमटवण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल.



























































