
सामना ऑनलाईन । मुंबई
माजी क्रिकेटपटू इम्रान खान हे येत्या १८ ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी हिंदुस्थानमधून काही माजी क्रिकेटपटू जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी इम्रान खानचे आमंत्रण धुडकावून लावले आहे. गावस्करांनी हिंदुस्थान इग्लंडच्या सामन्यााला हजर राहण्याचे कारण देत त्यांचे आमंत्रण नाकारले आहे.

‘१८ ऑगस्टला हिंदुस्थान इंग्लंडची मॅच आहे. माझ्या ठरलेल्या शेड्युलनुसार मला त्या मॅचला उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे मला इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहता येणार नाही. इम्रान खान अनेकदा हिंदुस्थानाता आले आहेत. हिंदुस्थानी जनतेशी संवाद साधला आहे. त्यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी ते प्रयत्न करतील अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असे सुनील गावस्कर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
इम्रान खान यांच्या १८ ऑगस्टला होणाऱ्या शपथविधीसाठी हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू, कपिल देव व सुनील गावस्कर यांना आमंत्रण पाठविण्यात आले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून ते शपथविधीसाठी पाकिस्तानात जाणार आहेत.




























































