
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ मदत देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले असतानाही यावरून राजकारण करणारे भाजपचे आमदार अनिल बोंडे यांना शिवसेना प्रवक्ते सुनील प्रभू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विदर्भातील शेतकऱयांना अनिल बोंडे यांनी फसवले म्हणून त्यांना घरी बसावे लागले, असा टोला सुनील प्रभू यांनी भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे यांना लगावला.
राज्यात परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिले जात आहेत. शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. असे असताना भाजपकडून प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जात आहे. असेच राजकारण माजी आमदार बोंडे यांच्याकडून करण्यात आले. त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुनील प्रभू यानी भाजपच्या नेत्यांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला. एकीकडे कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या उपाययोजनांबाबत जगभरातून कौतुक होत असताना भाजपकडून राजकारण केले जात आहे. पण सूर्यावर थुंकल्यावर थुंकी आपल्यावरच उडते, अशी समज सुनील प्रभू यांनी दिली.
























































