
रायगडमध्ये सध्या चार गद्दार असून सर्वात मोठे गद्दार सुनील तटकरे आहेत. या गद्दारांचा दोन लाखांच्या मतांनी पराभव करणार असल्याचा निर्धार इंडिया आघाडीने केला आहे. तर रायगडातील मुस्लिम बांधवांनीदेखील अब हम नही छोडेंगे.. अनंत गीते को चुन के लायेंगे, अशी शपथच घेतली आहे.
मुस्लिम बांधव कधीही गद्दारांना माफ करणार नाहीत, असे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. नागोठण्यातील हुजरा मोहल्ला येथे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे सुनील तटकरे यांचा जोरदार समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, देशातील वातावरण सध्या बदलले असून यावेळची निवडणूक ही दिशा देणारी ठरणार आहे. शरद पवार यांनी तटकरे यांच्या घरात सहा पदे दिली. पण तरीही त्यांनी पाठीत खंजीर खुपसले. याचा बदला रायगडची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदवीधर मतदारसंघाचे प्रचार यंत्रणाप्रमुख किशोर जैन यांचेही यावेळी भाषण झाले. ते म्हणाले, नागोठण्याचा गड मजबूत असून ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी १६ सदस्यांसह सरपंच भरघोस मतांनी निवडून आले. लोकसभा निवडणुकीतही विजयाची परंपरा सुरूच राहणार असून शिवसेनेचे अनंत गीते यांना विजयी करणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. या प्रचारसभेत राजा ठाकूर, सुवर्णा वाळुंज, मनीषा ठाकूर, निलोफर पानसरे यांचीही भाषणे झाली.
रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील, मुस्लिम नेते शेख सुभान अली, राज्य विस्तारक सुधीर ढाणे, कामगार नेते साधूराम मालुसरे, उपजिल्हा संघटक दर्शना जवके, जिल्हा युवती अधिकारी धनवंती दाभाडे, शिवदूत कीर्तीकुमार कळस, शंकरराव म्हसकर, डॉ. अनवर हाफिज, असपाक पानसरे, ऋतुजा म्हात्रे, कांचन माळी, शबाना मुल्ला, गणपत म्हात्रे, संजय भोसले, संजय महाडिक, डॉ. मिलिंद धात्रक, अकलाक पानसरे, धनंजय जगताप, ज्ञानेश्वर साळुंखे, इम्रान पानसरे, संजय काकडे, सोहेल पानसरे, आसिफ मुल्ला आदी उपस्थित होते.




























































