
भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत अग्निशमन दलाने सनराइज रुग्णालयात उपचार घेत असणाऱया 67 जणांची सुखरूप सुटका केली होती. यातील 46 जणांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते तर यातील 21 रुग्णांचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र या कोरोना रुग्णांना कोणतीही लक्षणे नसून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यातील काही रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
भांडुपमधील ड्रीम्स मॉलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीचे लोण तिसऱया मजल्यावर असलेल्या सनराइज या कोरोना रुग्णालयापर्यंत पसरले आणि धुरामुळे गुदमरून 9 रुग्णांचा मृत्यू झाला तर दोन रुग्ण या घटनेआधीच दगावल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले होते. अग्निशमन दलाने 67 जणांना जिवाची बाजी लावून वाचवले. मात्र वाचवण्यात आलेल्यांपैकी 21 रुग्ण बेपत्ता झाल्याचे समोर आले होते.
मात्र पालिकेने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सनराइज रुग्णालयातील या 21 रुग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्या सर्वांचे पत्ते पालिकेकडे असून दरदिवशी त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली जात आहे. यातील काही जण कोरोनामुक्त झाले आहेत तर काही जणांचा क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
‘त्या’ अग्निशमन जवानांवर विशेष लक्ष
अग्निशमन दलाच्या जवानांनी ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत सुरुवातीला सनराइज रुग्णालयातील 67 रुग्णांना वाचवले तर नंतर दीड दिवस टप्प्याटप्प्याने आग नियंत्रणात आणली. यात ज्या जवानांनी रुग्णांना वाचवले त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. यातील काही जवानांनी कोरोना लसीचे दोन तर काही जणांनी एक डोस घेतलेला आहे. मात्र तरीही या जवानांमध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसतात का यासाठी त्यांना ‘सेल्फ आयसोलेशन’ सांगण्यात आले असून काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख हेमंत परब यांनी दिली.
























































