आता चौकारांवर जेता ठरणार नाही! लढतीचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवणार

439

इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कपमधील अंतिम फेरीचा सामना निर्धारीत षटकांनंतर सुपर ओव्हरमध्येही बरोबरीत राहिला. यानंतर आयसीसीच्या नियमानुसार सर्वाधिक चौकार मारणाऱ्या इंग्लंडला चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आले. आयसीसीच्या या नियमावर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली. त्यामुळे आयसीसीने सोमवारी झालेल्या बैठकीत या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला. आता नव्या नियमानुसार सेमी फायनल किंवा फायनलची लढत निर्धारीत षटकानंतरच्या सुपर ओव्हरमध्येही बरोबरीत राहिली, तर निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हरचा खेळ सुरूच राहणार आहे.

आता यापुढील ट्वेण्टी-20 व वन डे वर्ल्ड कपमधील सर्व लढतींमध्ये सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात येणार आहे. याआधी फक्त बाद फेरीत सुपर ओव्हर नियमाचा अवलंब करण्यात येत होता. साखळी फेरीतील लढतीत सुपर ओव्हरमध्ये टाय झाल्यास ती लढत टाय असेल. पण सेमी फायनल व फायनलमध्ये निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. आयसीसीच्या या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. झिम्बाब्वे व नेपाळ यांच्यावर बंदी लादण्यात आली होती. मात्र त्यांचा पुन्हा एकदा आयसीसीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. पुरुषांच्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप व आयसीसी सुपर लीगपासून झिम्बाब्वेचा पुन्हा प्रवेश होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या