
सामना ऑनलाईन । मुंबई
क्रिडाप्रेमींसाठी आज सुपर संडे असून वर्ल्डकप आणि विम्बल्डनची महाफायनल आज खेळली जाणार आहे. वर्ल्डकपमध्ये यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंडचा संघ विजेतेपदासाठी ऐतिहासिक लॉर्डस मैदानात भिडणार आहेत, तर दुसरीकडे या वर्षीचे दुसरे ग्रँडस्लॅम विम्बल्डनच्या पुरुष गटाचा अंतिम सामना स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोवॉक जोकोविच यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही लढती लंडनमध्ये होणार असल्याने क्रीडाप्रेमींसाठी ही पर्वणीच आहे.
वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच नवा विजेता मिळणार आहे. इंग्लंडने 1992 नंतर पहिल्यांदाच फायनल गाठली आहे, तर न्यूझीलंडचा संघ 2015 मध्ये उपविजेता राहिला आहे. त्यामुळे दोन्ही संघ वर्ल्डकप उंचावण्यासाठी उत्सुक आहेत. सेमी फायनलमध्ये इंग्लंडने पाच वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, तर त्याआधी न्यूझीलंडने दोन वेळचा विजेता हिंदुस्थानचा पराभव करत फायनल गाठली.
दोन्ही संघाच्या फलंदाजीबाबत विचार केल्यास इंग्लंडचा ज्यो रूट 549 धावांसह आघाडीवर आहे, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने 548 धावा काढल्या आहेत. गोलंदाजीत इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 19 विकेट घेतल्या आहेत, तर लॉकी फर्ग्यूसनने न्यूझीलंडसाठी 18 बळी घेतले आहेत.
21 व्या ग्रँडस्लॅमसाठी फेडरर सज्ज
दुसरीकडे पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये फेडरर आणि जोकोविच यांच्यात सामना रंगणार आहे. फेडररने 8 वेळा विम्बल्डनचा किताब जिंकला आहे. त्याच्या नावावर 20 ग्रँडस्लॅम असून 21 व्या ग्रँडस्लॅमसाठी तो सज्ज आहे. तर जोकोविचने आतापर्यंत 15 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.






























































