सरन्यायाधीशांची सुरक्षा धोक्यात; गुप्तचर यंत्रणेबरोबरच गृह, परराष्ट्र मंत्रालयही चक्रावले

546

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. सुरक्षा व्यवस्था दुबळी असल्यामुळेच कुणीही उठून त्यांच्याजवळ जातंय, त्यांच्यासोबत सेल्फी काढतंय, त्यांना हार घालतंय. दिल्ली पोलिसांनीच हे प्रकार अत्यंत धोकादायक असल्याची चिंता व्यक्त केल्यामुळे गृह, परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच गुप्तचर यंत्रणाही चक्रावून गेली आहे. याबाबत तातडीने उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयात विविध संवेदनशील खटल्यांची सुनावणी चालते. या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश गोगोई यांच्याभोवती भक्कम सुरक्षा कवच असणे गरजेचे आहे. असे असतानाही दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत त्रुटी ठेवल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे. सरन्यायाधीशांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावरून गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, गुप्तचर यंत्रणा (इंटेलिजन्स ब्युरो) तसेच इतर विविध सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱयांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सरन्यायाधीशांची सुरक्षा अत्यंत ढिली असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत विविध मंत्रालयांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी तीक्र चिंता व्यक्त करून लवकरात लवकर सरन्यायाधीशांची सुरक्षा भक्कम करण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना दिले.

दिल्ली पोलिसांनीच कबूल केले अपयश

सुरक्षा यंत्रणांच्या बैठकीला दिल्ली पोलिसांचे सहआयुक्त (सुरक्षा) आय.डी. शुक्ला हेदेखील उपस्थित होते. सरन्यायाधीशांना भक्कम सुरक्षा पुरवण्यात आलेले अपयश त्यांनी बैठकीत कबूल केले. कुणीही उठतंय आणि सरन्यायाधीशांसोबत सेल्फी काढतंय, त्यांना हार घालतंय. हे प्रकार अत्यंत धोकादायक आहेत. हे प्रकार तातडीने रोखले पाहिजेत, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या