
आवडती व्यक्ती वैवाहिक आयुष्याची जोडीदार हवीय म्हणून तिला खोटी आश्वासने देणाऱया, स्वतःबद्दल मोठय़ा बढाया मारणाऱया जोडप्यांना सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे.
लग्नासाठी जोडीदाराशी खोटय़ा आणाभाका करता कामा नये. केवळ पुरुष नव्हे तर महिलेनेही खोटे दावे करून आपल्या जोडीदाराची दिशाभूल करू नये. कायद्यापुढे दोघेही समान आहेत, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले.
उत्तर प्रदेशात घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणाची सुनावणी करताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. जर दोन व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये पती-पत्नीच्या रूपात एकत्र राहत असतील आणि नंतर पती क्रूर वागू लागला तर त्यांच्यातील शरीरसंबंधाला बलात्कार म्हटले जाऊ शकते का, असा सवालही सरन्यायाधीशांनी उपस्थित केला.
आरोपी विनय सिंह प्रताप याने स्वतःविरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयाला विनंती याचिकेद्वारे केली होती. त्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने विनयच्या अटकेला दोन महिने स्थगिती दिली. मात्र विनयला कनिष्ठ न्यायालयात दाद मागायला सांगितले.
नेमके प्रकरण काय?
आरोपी विनयचे त्याच्या प्रेयसीशी दोन वर्षे संबंध होते. परंतु 2019 मध्ये प्रेयसीने दुसऱया तरुणाशी लग्न केले. त्यानंतर तिने विनयविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. विनयने फसवणूक करून सहमती घेतली आणि मनालीतील एक मंदिरात लग्न करून नंतर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले. हे संबंध म्हणजे बलात्कार आहे, असा दावा महिलेने केला. त्याआधारे पोलिसांनी विनयविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला. त्याला आव्हान देत विनयने सर्वेच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.


























































