रविवारी सकाळीच अजितदादांना भेटले, शपथविधी बघून धक्का बसला – सुप्रिया सुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supriya-sule

रविवारी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत भाजप मिंधे सरकारमध्ये सामिल झाले. रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेटायला बोलावले. होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे देखील त्यांच्यात बंगल्यावर होत्या. सुप्रिया यांनी नुकतीच एका मुलाखतीत ही माहिती दिली.

”रविवारी सकाळी मी अजित दादांना भेटले. सकाळपासून मी त्यांच्या घरी होते. बऱ्याच विषयावर आमच्या चर्चा झाल्या. त्यानंतर काही वेळात राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्या निवास्थानी येऊ लागले. मला वाटलं प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठीच दादांची तयारी सुरू असेल. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी विरोधी पक्ष नेते पद नको असून पक्षाच्या बांधणीसाठी काम करायचे असल्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर जसे मी तिथून निघाले, अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांना घेऊन राजभवनात पोहोचले”., असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

मला आश्चर्य नाही झालं धक्का बसला

”शिंदे-फडणवीस सरकारसोबत ते गेले याचं मला आश्चर्य नाही वाटलं मला धक्का बसला. खरंतर मी खूप निराश झाले. याआधीही अनेक वरिष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला पण ते रितसर शरद पवार यांना भेटले. त्यांची कारणं सांगितली व त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. शरद पवार यांनी कधीच कुणाला थांबवलं नाही”, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

शरद पवार यांचा अजित पवारांना पाठिंबा?

शरद पवारच या सर्व घडामोडींच्या मागे असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी सांगितले की,”जर शरद पवार या सगळ्या मागे असते तर ते लगेच असे अॅक्शन मोडमध्ये आले नसते. त्यांनी सुनिल तटकरे व प्रफुल पटेल यांच्या सह त्या नऊ आमदारांवर कारवाई केली नसती”, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.