
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरेगाव येथील कार्यक्रमात शिवसेना व राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे. ”ते आता महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत होते मात्र जेव्हा ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा त्यांना ही नैतिकता आठवली नव्हती का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
”मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अत्यंत विनम्रतेने एक प्रश्न विचारायचा आहे. एक लहान बहिण म्हणून मी हा प्रश्न विचारतेय की अडीच वर्ष जेव्हा तुम्ही महाविकास आघाडीत मंत्री होतात तेव्हा तुम्हाला हे सर्व आठवलं नाही का? जे आमच्यावर आरोप करत आहेत ते अडीच वर्ष जेव्हा या सरकारमध्ये होते तेव्हा त्यांना नैतिकता नाही आठवली का? गेल्या वर्षी 20 जूनलाच ते मला उद्धव ठाकरेंच्या कार्यालयात मला भेटले होते. त्याचं काय झालं?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
”हे सरकार जे कुणी खरं बोलेल त्यांच्याविरोधात पोलिसी कारवाई करत सुटले आहे. हे सरकार घाबरतं. आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. संविधनाने आम्हाला हा अधिकार दिला आहे. ज्याप्रकारे आमचा आवाज दाबला जातोय ते चुकीचं आहे. याला दडपशाही म्हणतात. ही लोकशाही आहे. आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. तो कुणीही आमच्याकडून हिरावू शकत नाही”, असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.
मुंबई महापालिकेच्या कॅग रिपोर्टवर चौकशी बसवली आहे. त्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ”हे सर्व खुनशी वृत्तीने सुरू आहे. आपणही या सरकारमध्ये होता. त्या यंत्रणेचा तुम्ही एक भाग होतात. मग तेव्हा का नाही आठवलं. आता गद्दारी केल्यानंतर ते बोलत आहेत. ते ठाकरे कुटुंबाला टार्गेट करण्यासाठी ते करत आहेत”,





























































