भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा, सुप्रिया सुळे यांनी घेतली फिरकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंत्राटी भरतीवरून तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करत भाजपवर निशाणा साधला.

सुप्रिया सुळे ट्विटमध्ये म्हणतात, भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा माफीनामा…! माफीनामा…!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा.

राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उप-उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पुर्वसूरींवर फोडायची खोड आहे. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती, असा टोला सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

विजय वडेट्टीवर यांचा हादरवणारा गौप्यस्फोट, भाजपने नाक घासून प्रायश्चित्त घेण्याची केली मागणी

कंत्राटी भरतीचा निर्णय 2011 व 2021 सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही. भाजपाच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मंत्र्यांची यादीच दिली.

2011 सालातील मंत्री

1. विजयकुमार गावीत,
2. राधाकृष्ण विखे पाटील,
3. अजित पवार,
4. नारायण राणे,
5. दिलीप वळसे पाटील,
6.छगन भुजबळ,
7. सुनील तटकरे,
8. हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीच्या शासनकाळातील मंत्री

1. एकनाथ शिंदे
2. अजित पवार,
3. दिलीप वळसे पाटील,
4. छगन भुजबळ,
5. उदय सामंत,
6. धनंजय मुंडे,
7. शंभूराज देसाई,
8. गुलाबराव पाटील,
9. दादा भुसे,
10. संजय राठोड,
11. संदीपान भुमरे,
12 अब्दुल सत्तार,
13. संजय बनसोडे,
14. आदिती तटकरे