
अतिशय दुर्मिळ प्रजातींमधील ‘सुपुष्पा’ वनस्पती महाबळेश्वर येथे बहरली आहे. ही वनस्पती 16 वर्षांनी बहरते आणि नंतर मृत होते. ‘सुपुष्पा’मुळे महाबळेश्वरच्या सौंदर्यात भर पडत आहे. तिचे परागीभवन व्यवस्थित व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
सह्याद्रीच्या डोंगररांगांत ‘कारवी’ या वनस्पतीच्या अनेक प्रजाती आढळतात. यातील काही प्रजातींना ठरावीक वर्षांनंतरच फुले येतात. ही एक अनोखी निसर्ग साखळी आहे. कारवी वनस्पतीच्या प्रजातीतील सुपुष्पा (पिचकोडी) सध्या महाबळेश्वरमध्ये बहरली आहे. पॅसल व सावित्री पॉइंटजवळ साधारणपणे आठवडाभरापासून सुपुष्पाच्या बहराला सुरुवात झालेली आहे. या वनस्पतींचे परागीकरण व्यवस्थित व्हावे म्हणून वन विभागाकडून महाबळेश्वरमधील पॅसल व सावित्री हे दोन पॉइंट दहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
सध्या सुपुष्पा वनस्पतीला बहर येण्यास सुरुवात झाली आहे. आणखी 15 दिवस बहर कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र त्याचे रूपांतर बियांमध्ये होईल. बियांपासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते. मात्र त्यासाठी सुपुष्पाच्या फुलांचे परागीभवन होणे महत्त्वाचे असते. मधमाशी, फुलपाखरे आपापल्यापरीने परागीभवन करताना दिसत आहेत. पर्यटकांच्या गर्दीने परागीभवनात अडथळे येण्याची शक्यता असते.




























































