>> सुरेश वांदिले
अलेक्सा गोर्जीला आज तेजोमयीने ससा आणि कासवाची गोष्ट सांगण्याची गळ घातली.
“अगं, किमान पन्नास वेळा ही गोष्ट तू ऐकली असशील ना,’’ गोर्जी म्हणाली.
“म्हणून काय झालं? काही गोष्टी पुनः पुन्हा ऐकण्यात मजा वाटते.’’ तेजोमयी म्हणाली.
गोर्जीचा नाईलाज झाला. डोळे मिटून ती काही क्षणांत माहितीच्या महाजालातून फिरून आली.
“कुठे हरवलीस तू?’’ तेजोमयीने तिला हलवले.
“मी कासव आणि सशाला शोधत होते.’’
“तुला भेटले का ते? परवानगी घेतलीस का त्यांची गोष्ट सांगण्यासाठी? मग सांग की आता.’’
“हो हो, किती घाई करतेस तू. त्या दोघांना मी भेटले तेव्हा ससा कासवाला सॉरी म्हणताना दिसला.’’
“कशासाठी बॉ?ते दोघे काय बोलत होते हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालीय बघ.’’ तेजोमयी म्हणाली.
“ससोबाला धावण्याची शर्यत लावण्यासाठी कासव आग्रह करत होता नि ससा धावायला तयार नव्हता. मग कासवोबा चिडला.’’
“तू घाबरतोस की काय मला?’’ कासव म्हणाला.
यावर ससा हसला. हा कासवोबाला अपमान वाटला. तो ससोबाला रागावत म्हणाला,
“मी तुझी तक्रार सिंह महाराजांकडे करीन.’’
त्या रागारागात तो सिंह महाराजांकडे गेला. सिंह महाराजांनी ससोबाला बोलावून घेतले.
“ससुल्या तुझ्या पूर्वजाने या कासवोबाच्या पूर्वजासोबत शर्यत लावली होती. त्यात तो हरला. तशीच भीती तुला वाटते का? म्हणून तू या कासवूल्यास शर्यतीसाठी नकार देतोस वर अपमानही करतोस.’’
“महाराज शर्यत लावायला माझी हरकत नाही.’’
“हा हा हा!’’ कासव मध्येच हसला.
“गधडय़ा हसतोस कशाला?’’ महाराज रागावले.
“महाराज हा ससुटल्या तुम्ही शिक्षा कराल म्हणून आता शर्यतीसाठी तयार होतोय बघा. ’’ कासव छाती फुगवून म्हणाला.
“आता तू माझ्यासमोर तयार झालास आहेस तर शर्यतीला लगेच सुरू करा की.’’
“महाराज शर्यतीला तयार असल्याचे म्हणालो तरी मी धावणार नाही.’’ ससोबा ठामपणे म्हणाला.
“हा हा हा! पळपुटय़ा घाबरू!’’ कासव सशाला चिडवू लागला.
“महाराज मला हा कासवोबा काहीही म्हणाला तरी न धावण्याचा माझा निर्धार पक्का आहे.’’
“तुला हरण्याची भीती वाटते का?’’
“महाराज मला हरण्याची भीती वाटत नाही.महाराज आपल्या या जंगलात मनुष्यप्राण्याची किती चहलपहल वाढलीय. तो जंगलात भरधाव गाडय़ा चालवतो. आपला रस्ता त्याने डांबराचा केलाय. त्यावरूनच आम्हाला धावायला लागणार. आमची शर्यत सुरू असताना हा मनुष्यप्राणी भरधाव गाडी घेऊन येऊ शकतो. तेव्हा तो कासवोबाच्या अंगावरून गाडी घालायला कमी करणार नाही. तुम्ही पाठलाग केला तर त्याच्या गाडीचा वेग इतका असतो की, भुर्रदिशी निघून जायचा. जाता जाता मला पकडायचा नि मारून मेजवानी करायचा.’’
“बापरे!’’ ससोबाचं सांगणं ऐकून महाराजांच्या अंगावर शहारे आले. सर्व दरबारीसुद्धा घाबरून गेले.
“मनुष्यप्राण्याला जंगल म्हणजे जणू काही त्यांचं राज्य असून कधीही काहीही केलं तरी चालू शकतं असं वाटतं. जंगलातील प्राण्यांना तो कस्पटासमान समजतो. त्यामुळे आपणास जीव मुठीत धरूनच राहावं लागतं.’’ ससोबा अश्रू ढाळत म्हणाला.
“ससुटल्या तू म्हणतोस ते खरंय. आपल्या पूर्वजांच्या काळातलं जंगल नि आजचं जंगल खूप वेगळं आहे. मनुष्यप्राण्याने आपल्यासोबत कधी शर्यत लावली नसूनही आपण हरलोय रे…’’ महाराज अश्रू ढाळत म्हणाले.
कासवोबास शर्यतीचा धोका कळला. त्याने शर्यतीचा हट्ट सोडून दिला. ससोबाची क्षमा मागितली. गोर्जीने गोष्ट संपवली.
“कशी वाटली गोष्ट?’’
“कुठे घडलं हे सारं?’’
“कुठे कशाला घडायला हवं? सिंह महाराजांना बोलता आलं तर ते हेच सांगतील की.’’ गोर्जी म्हणाली.
“पण ते बोलतील कधी?’’
“त्यासाठी तू बाप्पांकडे प्रार्थना कर की,’’ गोर्जी हसून म्हणाली.