भीमा कोरेगाव हिंसाचार – पी.जी. वूडहाऊस यांच्या पुस्तकामुळे धोका कसा? ते तर विनोदी लेखक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी एनआयएने अटक केलेल्या गौतम नवलखा यांनी इंग्रजी लेखक पी. जी. वूडहाऊस यांचे पुस्तक वाचण्यासाठी मागितले असून सुरक्षेच्या कारणास्तव हे पुस्तक देण्यास तळोजा तुरुंग प्रशासनाने नकार दिला आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाने आज आश्चर्य व्यक्त केले. पी. जी. वूडहाऊस हे तर विनोदी लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकामुळे सुरक्षतेबाबत कसा काय धोका निर्माण होऊ शकतो, असा विनोदी सवाल खंडपीठाने एनआयएला केला.

तळोजा कारागृहात असलेल्या नवलखा यांना पायाभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. त्यांचा चष्मा चोरीला गेला असून घरून पाठवलेला चष्मा त्यांना तुरुंग प्रशासनाकडून दिला जात नाही. तसेच इंग्रजी लेखक पी. जी. वूडहाऊस यांचे पुस्तकही दिले जात नाही अशी माहिती नवलखा यांचे वकील ऍड. युग चौधरी यांनी दिली. त्यावर खंडपीठाने आश्चर्य व्यक्त करत एनआयएचे वकील संदेश पाटील यांना याबाबत जाब विचारला. हे खरे आहे का? वूडहाऊस यांच्या पुस्तकामुळे खरेच धोका निर्माण होऊ शकतो का? असा सवाल एनआयएला विचारला तसेच हे सर्व हास्यास्पद असल्याचेही न्यायमूर्तींनी सांगितले. ज्येष्ठ मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे हे वूडहाऊस यांच्या पुस्तकांतून प्रेरणा घेत असत याची आठवण करून देत कैद्यांशी अशा प्रकारे वागणूक ही कामाची पद्धत आहे का, असे न्यायमूर्तींनी फटकारले. तसेच एखाद्या कैद्याचे तुरुंगातील जगणे सुसह्य व्हावे यासाठी किमान त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हायला हव्यात असेही एनआयएला खंडपीठाने सुनावले.