
शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार सोमवार (दि. 5) पासून जिह्यातील शाळांची वेळ सकाळी करण्यात आली आहे. काल पहिल्याच दिवशी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्यासह जिल्हाभर गटशिक्षणाधिकारी अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी एकाच वेळी सकाळच्या सत्रात भरणाऱया शाळांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव अधिकाऱयांना आले.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे आणि शिक्षणाधिकारी पाटील यांनी सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी नगर तालुक्यातील नेप्ती गावाजवळील होळकर वस्ती शाळेला भेट दिली. त्यावेळी संबंधित शाळाच बंद होती. त्यानंतर नेप्ती गावातील शाळेला 7 वाजून 5 मिनिटांनी भेट दिली. यावेळी शाळेवर असणाऱया पाचपैकी 2 शिक्षक गैरहजर होते. तर, एक शिक्षिका उशिरा आल्या. त्यानंतर याच परिसरातील रानमळा शाळेला भेट दिली. शाळेतील स्वच्छता, नियोजनबद्ध परिपाठ पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी लांगारे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिली.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी लांगारे यांना आढळलेल्या त्रुटी आणि गैरहजर तसेच उशिरा येणाऱया शिक्षकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी नगरच्या गटशिक्षणाधिकाऱयांना दिले आहेत. अशीच तपासणी काल सकाळी सातपासून जिल्हाभर राबविण्यात आली. जिह्यात गटशिक्षणाधिकारी आणि त्यांच्या टीमने 462 शाळांना भेटी दिल्या. यात त्यांना चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले. अनेक ठिकाणी शाळांची वेळ सकाळची असताना विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. तसेच अनेक शाळांचा परिसर अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. संबंधित ठिकाणी शिक्षकांना सूचना देण्यात आल्या असून, विनापरवानगी गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.
तपासणी झालेल्या शाळा
अकोले 82, जामखेड 13, कर्जत 14, कोपरगाव 19, नगर 9, नेवासा 29, पारनेर 23, पाथर्डी 45, राहाता 22, राहुरी 16, संगमनेर 32, शेवगाव 84, श्रीगोंदा 64 आणि श्रीरामपूर 10 यांचा समावेश आहे.
शिक्षिकांमध्ये नाराजी
जिह्यातील शाळांची वेळ ही सकाळी करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली. प्रशासनानेदेखील शाळांची वेळ सकाळची केली. मात्र, सकाळी सात वाजता शाळा भरवण्यात येत असल्यामुळे लांब अंतराहून येणाऱया शिक्षिकांना घरातील सर्व कामे उरकून सातपूर्वी शाळेत हजर राहावे लागत आहे. यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.

























































