मंथन – ‘फास्ट फूड नेशन’कडे वाटचाल?

>> सूर्यकांत पाठक

अलीकडेच जारी केलेल्या ग्राहक सर्वेक्षण अहवालातून  हिंदुस्थानींच्या आहारशैलीतील बदलांचा एक मोठा प्रवाह समोर आला आहे.  त्यानुसार हिंदुस्थानींच्या आहारामध्ये रेडी टू मिक्स, पॅक्ड फूड आदी फास्ट फूडचा वापर करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण वाढत असताना डाळी, कडधान्ये या पारंपरिक पोषणयुक्त अन्न घटकांचा वापर कमी झाल्याचे हा अहवाल दर्शवतो आहे. विकसित देश म्हणून पुढे येणारा हिंदुस्थान आता फास्ट फूड नेशन बनण्याच्या दिशेने जाणे ही बाब चिंताजनक आहे. कारण फास्ट फूडच्या सेवनाने आरोग्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतात हे अभ्यासांती स्पष्ट झाले आहे. सबब, त्याची कास सोडून सकस आणि पोषक घटकांनीयुक्त हिंदुस्थानी पारंपरिक आहारपद्धती अंगीकारणे बदलत्या काळात गरजेचे आहे.

केंद्रीय संख्यिकी विभागाकडून नुकताच हाऊसहोल्ड कन्जम्पशन एक्स्पेंडिचर सर्व्हे (एचसीईएस) अर्थात ग्राहक उपभोग खर्च सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला असून त्यात ग्रामीण भाग व शहरी भागात खर्चाचे प्रमाण कसे बदलत गेले आहे, याविषयीची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. या सर्वेक्षणातून हिंदुस्थानींची आहारशैली बदलत असल्याचे स्पष्टपणाने दिसून आले आहे. हा अहवाल ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 या काळातील आहे. सुमारे 11 वर्षांच्या खंडानंतर प्रकाशित झालेल्या या सर्वेक्षणाची तुलना अगोदरच्या सर्वेक्षणाची करता येणार नाही. मात्र नव्या अहवालामध्ये अनेक गोष्टी असून त्यातून काही बदलते प्रवाह स्पष्टपणाने दिसून येतात. यातीलच एक ट्रेंड हा हिंदुस्थानी खानपानाशी संबंधित आहे.

या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहिल्यास हिंदुस्थानींकडून अन्नधान्यावर होणाऱ्या एकूण खर्चात धान्य आणि डाळीचा वाटा हा ग्रामीण व शहरी भागात वेगाने घसरताना दिसून येत आहे. हिंदुस्थानींच्या ताटातून कडधान्य आणि डाळी हद्दपार होताना दिसत आहेत. 1999-2000 मध्ये ग्रामीण कुटुंबाच्या एकूण खर्चामध्ये 22.16 टक्के वाटा धान्याचा असायचा. तो कमी होत 4.91 टक्यांवर आला आहे. शहरी कुटुंबाचा विचार केल्यास याच कालावधीतील अन्नधान्यावरचा खर्च 12 टक्यांवरून 3.64 टक्यांवर आला आहे. 1999-2000 मध्ये ग्रामीण कुटुंबात डाळींवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या 3.81 टक्के असायचा. तो कमी होत 1.77 टक्यांवर आला आहे.  यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेर्तंगत दिले जाणारे मोफत आणि अंशदान पुरस्कृत धान्य वितरण असू शकते. परंतु या नव्या सर्वेक्षणानुसार हिंदुस्थानी लोक आता दूध, अंडी, मासे, मांस, फळ आणि भाजीपाला यावर अधिक खर्च करत आहेत. हिंदुस्थानातील नागरिक ड्राय फ्रुट्सचे अधिक सेवन करत आहेत. याबाबत चिंता बाळगण्याचे कारण नाही. उलट या गोष्टी आरोग्यदायी असल्याने हा बदल स्वागतार्हच म्हणायला हवा.

या अहवालातील चिंताजनक गोष्ट म्हणजे, शहरी आणि ग्रामीण हिंदुस्थानात 2011-12 मध्ये पेयपान व प्रोसेस्ड फूडवरील दरडोई खर्च हा एकूण मासिक खर्चाच्या 7.9 टक्के होता आणि तो आता 9.4 टक्के झाला आहे. 1999-2000 मध्ये हा आकडा 4.19 टक्के होता. तसेच मागील दशकांत याच कालावधीत ग्रामीण हिंदुस्थानातील पान, तंबाखू आणि अन्य अमली पदार्थांवर होणारा खर्च हा 3.21 टक्यांवरून 3.70  टक्के झाला. 1999-2000 मध्ये हा आकडा 2.87 टक्के होता. या आकड्यावरून बदलत्या आहारशैलीचे आकलन होते.

हिंदुस्थानी शहरांमधील आहारासंबंधीची आकडेवारी तर धक्कादायकच आहे. या अहवालानुसार शहरी हिंदुस्थानात एकूण मासिक उपभोग खर्चापैकी 11 टक्के खर्च हा रेडी फूड आणि

पॅक्ड फूडवर केला जात आहे. हिंदुस्थानात जीवनशैलीशी संबंधित आजारपणाचा फैलाव होत असताना प्रोसेस्ड फूडची म्हणजेच प्रािढयायुक्त पदार्थांची वाढती मागणी ही त्यात भर घालत आहे. या अहवालामध्ये ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांत उपचारावरील (रुग्णालयात दाखल, ओपीडी हे दोन्ही) खर्च वाढला असल्याचेही दिसून आले आहे. चुकीचा आणि पोषणरहित आहार हा आपल्या आरोग्याला असणाऱ्या धोक्यापैकी एक मानला जातो. सकस आणि आरोग्यदायी आहाराचे समर्थक हे निरामय आरोग्यासाठी आहाराविषयी जागरूक असणे, आहार शिस्त बाळगणे या गोष्टींची नितांत गरज असल्याचे सांगतात.

अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न हे असंसर्गजन्य रोगाची जोखीम वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2023 च्या अहवालात चटपटीत किंवा खारावलेल्या स्नॅक्सचे वाढते सेवन अत्यंत चिंतेचे असल्याचे म्हटले होते. अशा खाद्यपदार्थांच्या सेवनाने उच्च रक्तदाब आणि अन्य असंसर्गजन्य आजारांची जोखीम वाढते.

‘द ग्रोथ ऑफ अल्ट्रा प्रोसेस्ड फूड इन इंडिया: अॅन अॅनालिसिस ऑफ ट्रेंड्स, इश्यूज, अँड पॉलिसी रिकमेंडेशन’ मथळ्याखाली जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, ठोक पीच्या प्रमाणात रेडीमेड आणि तुलनेने सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या श्रेणीत सॉस, ड्रेसिंग, मसाले यांचे वर्चस्व दिसून येत आहे. त्याचबरोबर इस्टंट नूडल्स आणि रेडी टू इट खाद्यपदार्थांचा समावेश आहे. ही उत्पादने साखर, मीठ आणि चरबीयुक्त असल्याने त्याचे नियमित सेवन हे आरोग्याला हानिकारक आहे. तथापि, या उत्पादनांचा एकूण अन्नपदार्थांच्या पीतील वाटा हा 90 टक्के झाला असून तो 2011 मध्ये 80 टक्के होता.

अतिसाखरयुक्त आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असणारे असे पदार्थ नाश्त्यामध्ये नियमित सेवन केले जात असल्याचा संबंध मधुमेह, हृदयविकारांसारख्या व्याधींशी असल्याचे सांगितले जाते. उच्च ग्लायसेमिक इंडेक्सच्या परिणामामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होऊन मधुमेहींमध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, हिंदुस्थानातील लहान मुलांत आणि किशोरवयीन मुलांत साखरेची पातळी अतिरिक्त असण्याचे प्रमाण वाढत आहे. यामागे हिंदुस्थानी मुलांमध्ये वाढत चाललेले फास्ट फूडचे आकर्षण हे असल्याचे मानले जाते. द लॅन्सेटने एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये आपला हिंदुस्थान देश हा लठ्ठपणाच्या विळख्यात अडकत चालल्याचे नमूद करण्यात आले आहे.

1972 मध्ये जेव्हा फास्ट फूड हा प्रकार बाजारात आला, तेव्हा लोकांना त्यातून अधिक ऊर्जा मिळावी, असा हेतू होता. परंतु फास्ट फूड बनविणाऱ्यांनी प्रचंड पैसा कमावला आणि ते खाणाऱ्या लोकांनी आरोग्याची फिकीर अजिबात केली नाही. आजही याचे दुष्परिणाम समोर येत असूनही त्यांची लोकप्रियता घटलेली नाहीये.

एरिक श्लॉसर यांनी 2001 मध्ये प्रकाशित ‘फास्ट फूड नेशन: द डार्क साईड ऑफ द ऑल-अमेरिका मील’ या पुस्तकात अमेरिकेतील फास्ट फूड उद्योगाचे वर्णन केले. या उद्योगाने अमेरिकेतील खाद्य संस्कृती कशी बदलली, याचे सविस्तर विवेचन केले. या संस्कृतीमुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर वाढले आहे. लठ्ठपणा वाढण्यास हातभार लावला आहे आणि जगभरातील खाद्य उत्पादनात बदल घडवून आणला आहे. हिंदुस्थानने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. विद्यमान शासनाने फास्ट फूडच्या विळख्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी मिलेटस्चा प्रचार वेगाने सुरू केला आहे. स्वत पंतप्रधान याविषयी जाहीरपणाने जनप्रबोधन करत आहेत. भरड धान्यांमध्ये अनेक पोषक तत्त्वे समाविष्ट असतात. एकेकाळी महाराष्ट्रातील मुख्य आहारामध्ये बाजरीचा समावेश असायचा. पण पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करत पुढे निघालेली पिढी पारंपरिक अन्नापासून लांब गेली. ताज्या सर्वेक्षणाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. दुर्धर आजारांना निमंत्रण देणारे हे आहारपदार्थ मागे सारून पारंपरिक सकस, पोषणयुक्त आहाराचे सेवन करण्यावर भर दिल्यास उत्तम आयुरारोग्य लाभू शकेल.

(लेखक अ.भा.ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.)