
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात त्याच्याकडे घरच्या देखरेखीचं काम करणाऱ्या व्यक्तिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. मृत्युपूर्वी काही दिवस आधी सुशांतने गांजाचे सेवन केल्याचं त्याने म्हटलं आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, नीरज सिंह नावाची ही व्यक्ती असून नीरज सुशांतकडे जवळपास वर्षभरापासून कामाला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला होता. त्याच्या म्हणण्यानुसार तो दररोज घराची साफसफाई करत असे. सुशांतची बेडरूमही तोच साफ करत असे. नीरज त्याच्या काही परिचितांमार्फत 2019 मधील मे महिन्यात सुशांतकडे कामाला लागला होता. नीरजच्या म्हणण्यानुसार सुशांतच्या कॅप्री हाईट्स या पाली मार्केट परिसरातील घरामध्ये काम सुरू केलं होतं. साफसफाई करणं, पाळीव कुत्र्यांना फिरवून आणणं, चहा नाश्ता आणून देणं इत्यादी कामे तसेच सुशांतची वैयक्तिक कामं तो करत असे.
नीरजच्या म्हणण्यानुसार त्याने काम सुरू केलं तेव्हा रजत मेवाती, सिद्धार्थ पिठानी, आयुष, सॅम्युअल मिरांडा, आनंदी, सॅम्युअल हकीब, अशोक केशव खासू ही मंडळी सुशांतचा स्टाफ म्हणून काम करत होती. त्यानंतर 2019च्या डिसेंबर महिन्यात सुशांत वांद्र्यातील माउंट ब्लँक इमारतीत राहायला गेला. सुशांतच्या आधीच्या घरी जेव्हा सुशांत कधी कामाला बाहेर जात असे, तेव्हा तो बेडरूम लॉक करत असे आणि किचनमध्ये चावी ठेवत असे. मात्र, त्याचा मृत्यू झाला त्या नवीन घरात फक्त सुशांत आत असेल तर किंवा रिया त्याच्यासोबत असेल तरच त्याच्या बेडरूमचा दरवाजा बंद असायचा. घरच्या बाकी कोणत्याही खोल्या कधीच बंद नसत, असा खुलासा त्याने केला आहे.
नीरजने सविस्तरपणे जबाब देताना म्हटलं की, सुशांतचा मृत्यू झाला त्याच्या काही दिवस आधीच त्याने सुशांतला गांजा असलेल्या सिगरेट्स रोल करून दिल्या होत्या. जेव्हा सुशांतचा मृतदेह त्याच्याच घरात लटकलेला आढळला त्याच दिवशी त्याने त्या सिगरेट्स ठेवलेला बॉक्स तपासला होता. तो संपूर्णपणे रिकामी होता, असं नीरज याने पोलिसांना सांगितलं आहे.






























































