
‘‘नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यवसायात सुरुवातीला अनंत अडथळे येतात, ठेचा बसतात. या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका. पुढे चालत राहा,’’ असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केले.
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या वतीने हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेत सरन्यायाधीश लळीत बोलत होते. यावेळी सोलापूरचे सुपुत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतल्याने त्यांचा सोलापूरकरांच्या वतीने मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, सोलापूरचे रहिवासी असलेले न्यायाधीश एम. एस. कर्णिक, एन. जे. जमादार, विनय जोशी, राज्याचे महाधिवक्ता ऍड. आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम, निवृत्त न्यायमूर्ती उमेश लळीत, अमिता लळीत, झुमा दत्ता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. मिलिंद थोबडे आदी उपस्थित होते. यावेळी ‘ई-गव्हर्नन्स’चे प्रकाशन करण्यात आले. तसेच सरन्यायाधीश लळीत यांच्या हस्ते बार कौन्सिलच्या डिजिटायजेशनचेही लोकार्पण करण्यात आले.
सरन्यायाधीश लळीत म्हणाले, ‘‘सोलापूर ही माझी जन्मभूमी आहे. या ठिकाणी माझे शालेय शिक्षण झाले. जन्मगावाचे ऋणानुबंध कायम आहेत. मी 39 वर्षे वकिली व्यवसायात आहे. मला वकिली व्यवसायातून उदंड कीर्ती, मान, पैसा सर्व मिळाले. आता सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी जे आहे, ते परत करायचे आहे. वकिलांनी मूल्यांची शिदोरी घेऊन स्वतःवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावे, अडथळे पार होतील. ग्रंथालय आणि पुस्तकांचा आधार घेऊनच आम्ही शिखर गाठले. सध्या इंटरनेटच्या जमान्यात तुम्हाला संशोधन, अभ्यासासाठी प्रचंड साधने आहेत. ‘यू टय़ूब’वरही तुम्हाला वकिलांचा युक्तिवाद पाहायला मिळेल. सदैव सचोटीने काम करा. कक्षा भव्य आहेत,’’ असेही सरन्यायाधीश लळीत यांनी सांगितले.
न्यायाधीश दीपांकर दत्ता म्हणाले, ‘‘नवोदित वकिलांनी सर्व कायद्यांचा अभ्यास काळजीपूर्वक करून कायदे जाणून घ्यावेत. श्रमाशिवाय आपले ज्ञान वाढणार नाही. जीवनाला महत्त्व देऊन नम्रतेने भाषेवर प्रभुत्व वाढवावे.’’
‘‘सोलापूरचा माणूस न्यायव्यवस्थेच्या मुख्य स्थानावर पोहोचला, याबाबत नितांत अभिमान आहे. नवोदितांनी पैशासाठी वकिली करू नये. पैशाकडे लक्ष न देता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करा,’’ असे आवाहन कुंभकोणी यांनी केले.
बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य जयंत जायभावे यांनी प्रामाणिकपणाला महत्त्व देऊन समाजाला न्याय द्यावा. निष्पक्ष न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आत्मा असल्याचे सांगितले.
यावेळी लळीत कुटुंबातील सदस्य सविता लळीत यांनी लळीत कुटुंबातील चार पिढय़ा वकिलीमध्ये असल्याचे सांगितले.
लळीत, जोशी, जमादार, कुंभकोणी ही सोलापूरची चार रत्ने!
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘वकिलांनी न्यायालयात न घाबरता वाद-विवाद करून सामान्य नागरिकांना न्याय द्यावा. सोलापूरच्या मातीतल्या माणसाने न्यायव्यवस्थेत आपला ठसा उमटविल्याने सोलापूरकरांचा ऊर भरून येतो. चार हुतात्मा यांच्याप्रमाणेच उदय लळीत, विनय जोशी, एन. जे. जमादार आणि आशितोष कुंभकोणी ही सोलापूरची चार रत्ने आहेत. सर्वांनी सामाजिक न्यायासाठी योगदान द्यावे. बार कौन्सिलमधून खेडय़ातील, मागास समाजातील वकिलांना मदत करावी. जिह्यातून आणखी एक मुख्य न्यायाधीश तयार व्हावा,’’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


























































