काँग्रेस-राष्ट्रवादी नाही, शिंदे स्वतः थकलेत ; अजित पवारांचा टोला

1240

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. पण ते स्वतःच थकले आहेत, दोन्ही पक्ष थकलेले नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुण्यात आयोजित एका मेळाव्यात लगावला. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाताना मतदारांशी चांगला संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सुशील कुमार शिंदे यांनी सध्याची परीस्थिती पाहाता काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यातून त्यांनी दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचे संकेत दिले होते. तसेच याबाबत सगळीकडे जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भविष्यात पवार कुटुंबातील तरुण भाजपमध्ये येऊ शकतात असे म्हटले होते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवारांचा पारा चढला. पवारांशिवाय त्या चंपाला काहीच दिसत नाही, असे ते म्हणाले. तसेच हा शॉर्टफॉर्म आहे असे सांगतानाच अप म्हणजे अजित पवार, तसेच चंपा असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.  पाच आमदार राहिले असतानाही ते तितक्याच तत्परतेने हे सरकार बदलायचे आहे असे आक्रमक भूमिका घेऊन सांगतात याकडेही अजित पवार यांनी यावेळी लक्ष वेधले.

आपली प्रतिक्रिया द्या