
ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नईतून ललितला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील पसार झाला होता. मुंबई, पुणे पोलिसांची शोध पथके ललितच्या मागावर होती. या प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
ललित पाटीलचा जयसिंगहानी होऊ नये. ललित पाटीलला जर अटक करण्याचे श्रेय तुम्ही घेत असाल तर फरार करण्याचे श्रेयही त्यांना घ्यावे लागेल. ललित पाटीलला आम्ही अटक करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर मग त्यांना माहिती होती का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. ललित पाटील याने फरार होणे आणि आता त्याला अटक होणे. या सगळ्यात नेमके काय गौडबंगाल काय आहे, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली.
दादा भुसे यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे होते का? कारखाना कसा उभा राहतो? एवढ्या कोटींचा कारखाना कसा उभा राहतो? ससून रुग्णालयातील 16 नंबर वार्डचे गौडबंगाल काय आहे? याचे सत्य बाहेर आले पाहिजे. ज्या हॉटेलमध्ये ललित पाटीलचा वावर होता त्या त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस का जात होते, असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

























































