
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये बोलताना संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. अतिशय अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवरती जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे शिरसाट यांचे वक्तव्य आहे, असे नमूद करत सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
महिला आयोगाला हा तक्रार अर्ज प्राप्त झाला असून त्याची महिला आयोगाने दखल घेतली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी 26 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आणि माध्यम प्रतिनिधींसमोर अर्जदार यांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात यावा, असे अर्जदार यांनी नमूद केले आहे. राजकीय / सामाजिक क्षेत्रातील महिलेचा अवमान करुन त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसुन येत आहे. अर्जदार श्रीमती सुषमा अंधारे या अनेक वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत, त्यांच्याबाबत टिका करतांना लोकप्रतिनिधीकडून अश्लाघ्य भाषेचा वापर करणे ही गंभीर बाब आहे. सबब उपरोक्त प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.. तरी सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करावी व तसे अर्जदारास कळवावे, तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, 1993 कलम 12 (2) व 12 (3) नुसार आपण केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल 48 तासात आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा, असे पत्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना आमदार श्री संजय शिरसाठ यांनी श्रीमती सुषमा अंधारे यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेत टीका केली याबाबतची तक्रार @Maha_MahilaAyog कडे श्रीमती अंधारे यांनी दाखल केली आहे.1/2 @maharashtra_hmo @DGPMaharashtra @DMAurangabadMH @AbadCityPolice pic.twitter.com/t6ilyO2KE3
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 28, 2023





























































