
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्याच स्टाईलने पत्र पाठवून आठ खरमरीत प्रश्न उपस्थित केले आहेत. करोना काळात राज्य सरकारकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हटले होते. यावर सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. करोना काळातील मृत्यूंसाठी उद्धव ठाकरे जबाबदार असल्यास उत्तर प्रदेशात गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तुम्ही करणार का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना विचारला आहे.
सुषमा अंधारेंनी पत्राची सुरुवातच राज यांना टोला लगावत केली आहे. ‘पत्र लिहिण्यास कारण की, इंटरनेट आणि ई-मेलच्या युगामध्ये आजही आपण पत्रलेखनासारखी अत्यंत प्राचीन परंपरा जतन आणि संवर्धन करीत आहात त्यामुळे पत्राद्वारे हा संवाद आपल्याशी साधण्याचा प्रयत्न करत आहे. खारघर दुर्घटनेच्या संदर्भात किमान चार दिवसांनी का होईना काल आपण व्यक्त झालात हे एका अर्थी बरे झाले..! घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यावर कोणीही राजकारण करू नये, असे आपले म्हणणेही अगदी समायोचित आहे. पण पुढे आपण कोरोना काळात हलगर्जीपणा झाला असे म्हणत उद्धव साहेबांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भाषा केली. आपण अत्यंत सिलेकटीव्ह पद्धतीने व्यक्त झाला त्या संदर्भात काही प्रश्न उद्भवतात आणि ते विचारलेच पाहिजेत असे वाटते.
राज ठाकरेंना विचारले हे प्रश्न
> कोरोना महामारी ही निसर्गनिर्मित होती हे आपल्याला ज्ञात असेलच. पण खारघरमध्ये घडलेली दुर्घटना ही मानवनिर्मित आहे, कृपया याची नोंद घ्यावी.
> भारतरत्न सारखा पुरस्कार एका हॉलमध्ये दिला जातो आणि त्याचे प्रक्षेपण जगभर केले जाते. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढ्या मोठ्या गर्दी आणि सभेची गरज होती काय? गर्दीचे प्रशासकीय नियोजन का केले गेले नव्हते?
> श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुळात ही गर्दीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिंदे फडणवीस सरकारने एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. तर याचे राजकारण करू नका असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरते.
> कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्यता देण्याऐवजी पीएम केअर फंड मध्ये निधी द्या, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीसजी कोरोना काळात राजकारण करत नव्हते का?
> गर्दी टाळणे हाच मोठा उपाय असताना सुद्धा मंदिरे उघडलेच पाहिजे यासाठी सुपारीबाज लोकांना पुढे करून करून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे भाजपाई नेते राजकारण करत नव्हते का?
> सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे बंद असताना, जशी मंदिरे बंद होती वारी बंद होती तशी आंबेडकर जयंती सुद्धा साजरी झालीच नव्हती. पण मंदिरेच कशी बंद राहिली अशी आवई उठवत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना एवढ्या गंभीर काळामध्ये सहकार्य करायचे सोडून त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करणारे भाजप नेते राजकारण करत नव्हते का?
> असू द्या दादा मी आपल्याला फार अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही. पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आपल्या पक्षातल्या देशपांडे नावाच्या एका कार्यकर्त्याला साधे खरचटलेही नव्हते तरी सुद्धा आपण काय तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. बापरे, आपली ती शून्यात हरवलेली नजर माध्यमे वारंवार दाखवत होते. दादा, खारघरच्या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकाला आपण असेच धावतपळत भेटायला गेलात का नाही?
> कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल जगभरात घेतली गेली. आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. “धारावी पॅटर्न” तर जगभर गाजला. या उलट कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीवर प्रेतं तरंगलेली उभ्या जगाने पाहिली. प्रेतांची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यामुळे कोरोनाचा फैलाव उत्तर प्रदेशमध्ये अधिक प्रमाणात झाला. हा हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्य यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आपण काही सुतोवाच करणार आहात का?

























































