आणि, सुषमा स्वराज यांचा पुरणपोळी आणि मोदकाचा बेत अपूर्ण राहिला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा सुषमा स्वराज यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळा होता. सुषमा यांच्या निधनानंतर संजय राऊत यांनी फेसबुकवर अगदी चार दिवसांपूर्वी झालेल्या कौटुंबिक भेटीची भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

या भेटीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की “चार दिवसांपूर्वी भेट झाली होती. आमची ही अत्यंत कौटुंबिक स्वरुपाची भेट होती. अडीज ते तीन तास आम्ही गप्पा मारल्या. संसदेचे कामकाज संपल्यानंतर पुरणपोळी, उकडीचे मोदक खायला येते असं त्या म्हणाल्या. मुंबईतला पाऊस कमी झाला की दिल्लीतील घरी पुरणपोळी आणि मोदकाचा बेत करायचा असं ठरलं होतं.” मात्र हा बेत पूर्ण होऊ शकला नाही कारण सुषमा स्वराज यांचे अकाली निधन झाले.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणातील मातृत्व गमावले आहे. मी दिल्लीत आल्यानंतर इथे टिकून राहण्यासाठी सुषमा यांनी काही गोष्टी शिकवल्या आणि करून घेतल्या असेही राऊत म्हणाले. इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या लोकप्रिय महिला नेत्या असं म्हणतानाच राऊत यांनी म्हटले की नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करीत होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पंतप्रधानपदाची पहिली पसंती ही सुषमा स्वराजच होती.

“सुषमा यांनी कधीही कोणावर व्यक्तीगत हल्ला केला नाही, कमरेखाली वार करणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांचं प्रत्येक पाऊल संयमाचे होते. त्यांनी राष्ट्रहिताशी कधीही तडजोड केली नाही.” असं म्हणतानाच राऊत म्हणाले की सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे राजकारणातील मांगल्य संपले.

सुषमा यांच्या संसदेतील कार्यशैलीबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की ‘ सुषमा स्वराज ज्या पद्धतीने प्रतिवाद करीत असत, त्यासाठी त्यांना वेलमध्ये उतरण्याची किंवा आकांड तांडव करण्याची कधीच गरज भासली नाही. सुषमा यांनी मांडलेल्या विषयामुळे विरोधकांची बोलती बंद व्हायची.’ गेल्या काही वर्षात जी चिखलफेक राजकारणात होते, ती पाहिल्यानंतर सुषमा स्वराज या वेगळ्या होत्या असे राऊत यांनी म्हटले आहे.

आखाती देशात अडकलेल्या असंख्य हिंदुस्थानी नागरिकांना हिंदुस्थानात सुखरूपपणे आणण्याचे काम केलं. विदेशात एखाद्या हिंदुस्थानी नागरिकाला त्रास असेल आणि त्याने ट्विट केलं तर स्वराज सगळ्या परराष्ट्र मंत्रालयाला कामाला लावून त्या नागरिकाला मदत उपलब्ध करून देत होत्या याची आठवणही संजय राऊत यांनी करून दिली.