Ranji Trophy – मुंबईचं पोरगं हुशार! पदार्पणात द्विशतक ठोकलं, 28 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची केली बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणजी स्पर्धेमध्ये मुंबई आणि उत्तराखंड संघात क्वार्टर फायनलचा सामना रंगत आहे. या लढतीचा आज दुसरा दिवस असून मुंबईने आपली स्थिती मजबूत केली आहे. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या सुवेद पारकर (Suved Parkar) याच्या द्विशतकी आणि सरफराज खान (Sarfaraz Khan) याच्या दीडशतकी खेळीच्या बळावर मुंबईने आपला पहिला डाव 600 पार पोहोचवला आहे. 21 वर्षीय सुवेद पारकर याने द्विशतकी खेळी करत प्रशिक्षक अमोल मुदुमदार यांच्या 28 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

उत्तराखंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या नॉकआऊट लढतीमध्ये सुवेद पारकर याने द्विशतक ठोकले आहे. अजिंक्य रहाणे याच्या जागी संघामध्ये स्थान मिळालेल्या पारकरने आपली निवड सार्थ ठरवत उत्तराखंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. वृत्त लिहिपर्यंत पारकर याने 433 चेंडूचा सामना केला होता आणि तो 235 धावांवर खेळत होता. या खेळीदरम्यान त्याने 20 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारही ठोकले.

रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट लढतीमध्ये द्विशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. सुवेदआधी दिग्गज फलंदाज अमोल मुजुमदार याने 1994 ला हरयाणाविरुद्ध 260 धावांची खेळी केली होती. आता 28 वर्षानंतर मुजुमदार मुंबईच्या संघाचा प्रशिक्षक असून त्याच्याच मार्गदर्शनाखाली सुवेद पारकर याने हा विक्रम केला आहे.

प्रथम श्रेणीमध्ये पदार्पणात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

341 सकिबुल गनी (2022)
267* अजय रोहेरा (2018)
260 अमोल मजूमदार (1994)
256* बाहिर शाह (2017)
240 एरिक मार्क्स (1920)

सूर्यकुमार यादवकडून कौतुक

दरम्यान, सुवेद पारकर याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईचा खेळाडू सूर्यकुमार यादव यानेही ट्विट करत सुवेदचे अभिनंदन केले असून हे स्वप्नवत पदार्पण असल्याचे त्याने म्हटले.