‘स्वाभिमानी’ची कडकनाथ संघर्ष यात्रा सांगलीत रोखली, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ईश्वरपूर येथील सभेत कोंबडय़ा उधळण्यास निघालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कडकनाथ संघर्ष यात्रा सांगलीतच पोलिसांनी रोखली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सांगली जिह्यातील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने आत्मनिर्भर यात्रा काढली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ईश्वरपूर येथे या यात्रेचा समारोप होणार असल्याने ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी या सभेत कडकनाथ कोंबडय़ा फेकण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी आज सांगलीतून ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली कडकनाथ संघर्ष यात्रा काढण्यात येणार होती.

दुपारी स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कडकनाथ कोंबडय़ांसह सहभागी झाले. मात्र, यात्रा काढण्यापूर्वीच सांगली पोलिसांनी ही यात्रा रोखली. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली.

शेतकऱयांच्या हिताची बाजू घेऊन आत्मनिर्भर यात्रा काढणारे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ कोंबडय़ा घोटाळाप्रकरणात आवाज न उठवता या घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महेश खराडे यांनी केला. कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील शेतकऱयांवर झालेल्या अन्यायाची बाजू मांडण्यासाठी आम्ही संघर्ष यात्रा काढणार होतो. मात्र, पोलिसांनी ही यात्रा रोखली आहे. कडकनाथ घोटाळा प्रकरणातील प्रमुख सूत्रधारावर कारवाई व्हावी, अशी मागणी असल्याचे खराडे यांनी सांगितले.