आमरण उपोषण करणारे जी. डी. अग्रवाल यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वाराणसी

गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारी पातळीवर कोणत्याही उपायोजना न झाल्याच्या निषेधार्थ आयआयटी कानपूरचे माजी प्राध्यापक जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ग्यानस्वरुप आमरण उपोषणाला बसले होते. हृषिकेशमधील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्येत ढासळल्यामुळे बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले होते. अग्रवाल यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

आयुष्याच्या उत्तरार्धात अग्रवाल यांनी स्वामी ग्यानस्वरूप सानंद असे नाव धारण केले. 2012 सालीसुद्धा ते गंगा नदीसाठी उपोषणाला बसले होते. त्यावेळी जवळपास अडीच महिने त्यांचे उपोषण चालले. अखेर तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. त्यावेळीसुद्धा त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून दिल्लीला आणण्यात आले होते.

गंगा नदीसाठी स्वतंत्र कायद्याची मागणी केली होती
आयआयटी कानपूरमधून निवृत्त झाल्यानंतर प्राध्यापक अग्रवाल यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून काम केले. त्यांनी गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा ध्यास घेतला होता. त्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी गंगा प्रदूषणमुक्त करण्याचा नारा दिला होता, पण प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात विशेष प्रगती झालेली नसल्याने निराश झालेल्या अग्रवाल यांनी यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली होती.