
सामना प्रतिनिधी । मेहकर
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल अडीच लाखांपेक्षा अधिक भाविकांनी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त तालुक्यातील हिवरा आश्रम येथे आयोजित महापंगतीचा रविवारी लाभ घेतला. महाप्रसाद घेण्यापूर्वी लाखो भाविकांच्या मुखातून निघालेल्या स्वामी विवेकानंद की जय, भारत माता की जय, पू. शुकदास महाराज की जय.. या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता.
तब्बल 54 वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची रविवारी दुपारी 5 वाजेच्या दरम्यान तब्बल अडीच लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. या महापंगतीने सामूहिक महाप्रसाद सेवनाचा लाभ घेणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. सामूहिक शिस्तीची भक्ती दाखवित 50 एकराच्या परिसरात एकाचवेळी 53 पंगती बसल्या होत्या. तब्बल 101 ट्रॅक्टरद्वारे व चार हजार स्वयंसेवकांनी महाप्रसाद वितरणात सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे, कोणतीही अस्वच्छता न करता ही महापंगत उठली. सर्व भाविकांचे विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कुंकूम-चंदन तिलक लावून, धूपआरती ओवाळून पूजन केले.
श्रीश्रीश्री महामंडलेश्वर बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते तर खासदार प्रतापराव जाधव,आ.डॉ.संजय कुटे, आ.डॉ.संजय रायमूलकर, आ.बळीराम सिरस्कर, महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले पाटील, जि.प.सदस्य संजय वडतकर आदींची यावेळी उपस्थिती होती. महाप्रसाद स्थळावरील मनोऱ्यावरुन वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांचे सूत्रसंचलन सुरु होते. त्यांनी शंखध्वनीसह केलेल्या स्वामी विवेकानंद व पू. शुकदास महाराज यांच्या जयनाम घोषाने आसमंत निनादून गेला होता. लाखो भाविकांच्या मुखातून हा जयघोष उमटला होता. महापंगतीच्या सुरुवातीस विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाविकांचे पूजन करून त्यांना कुंकूम-चंदन तिलक लावला. त्यानंतर श्रीश्रीश्री १००८ महामंडलेश्वर बालब्रम्हचारी महाराज यांच्याहस्ते भाविकांना पुरी-भाजीचा प्रसाद वाटप करून महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. शिस्तबद्धपणे या लक्षावधी भाविकांनी भावपूर्ण वातावरणात हा महाप्रसाद सेवन केला.

























































