विवेकानंद जन्मोत्सव सोहळा : भव्य शोभायात्रेने हिवरा आश्रम नगरी दुमदुमली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

हिवरा आश्रमाचे निष्काम कर्मयोगी पू. शुकदास महाराज यांची रथारूढ मूर्ती आणि स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा.. रथासमोर स्वामी विवेकानंद की जय.. भारत माता की जय… शुकदास महाराज की जय.. या घोषणांचा टिपेला पोहोचलेला स्वर, आणि लेझीम, टाळ, मृदंगांचा यांचा निनाद अशा नामघोषात विवेकानंद नगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती. महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने भावभक्तीला अक्षरशः उधाण आले होते.

निष्काम कर्मयोगी पू. शुकदास महाराज यांनी स्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमाच्यावतीने आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्यास शुक्रवारी (दि.२५) भव्य शोभायात्रेने थाटात प्रारंभ झाला. ही शोभायात्रा डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. हरिहरतीर्थावरून ही शोभायात्रा दुपारी दोन वाजता सुरु झाली. हरिहरतीर्थावर विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, अशोक पाध्ये, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत आदींनी पू. शुकदास महाराजश्रींसह विवेकानंदांच्या रथारुढ मूर्तींचे पूजन करून शंखनिनादाने शोभायात्रेला प्रारंभ झाला.

तब्बल ३० लेझीम पथके, २० बँड पथके, ७१ दिंड्या व हजारो भाविक-भक्त यांच्या जयघोषात ही शोभायात्रा हिवरा आश्रम नगरीकडे प्रस्थान करती झाली. तब्बल तीन तास नामघोष अन् टाळ-मृदंगाच्या कल्लोळात हा नेत्रदीपक सोहळा मार्गक्रमण करत होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोहळ्याचे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात आगमन झाले. तेथे आखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाशबुवा जवंजाळ यांच्या हस्ते दहीहंडी फोडून या सोहळयाची सांगता झाली तर यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, अशोक पाध्ये, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, विश्वस्त प्रशांत हजारी, जि.प.सदस्य संजय वडतकर, सरपंच सौ.निर्मला डाखोरे, जेष्ठ पत्रकार सिध्देश्वर पवार, माजी सरपंच मनोहर गिऌहे, अशोकराव लहाने, कृउबा संचालक दामु आण्णा गारोळे यांची उपस्थिती होती.

या शोभायात्रेचे सूत्रसंचलन वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांनी केले. तर यावेळी साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सचिन यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक राणे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.