
केरळमध्ये कोरोना नंतर स्वाईन फ्लूचे सावट आहे. कोझीकोडे जिल्ह्याच्या काही भागात बर्ड फ्लू असल्याचे समोर आले आहे. कोडियाठूर भागात काही ठिकाणी मृत कोंबड्या आढळल्या होत्या. त्यांचे नमूने तपासल्यानंतर बर्ड फ्लूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
कोझोकोडेच्या एक किमी भागात सर्व कोंबड्यांना मारण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. बर्ड फ्लू रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील अशी माहिती आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी दिली आहे. हा बर्ड फ्लू इतर भागत पसरणार नाही यासाठीही प्रशासन काळजी घेत आहे.
राज्यातील बर्ड फ्लूला आळा घाला असे पशूपाल विभागाने अधिसूचना जाहीर करून आवाहन केले आहे. केरळ सरकारने प्रभावित भागातील १० किमी भागात आढावा घेण्यासाठी तीन सदस्यांची टीम बनवली आहे. डॉ. शौकत अली, डॉ. दिप्ती रावत आणि डॉ. शिवकुमार चिमाथा या टीमचे सदस्य आहेत. हे डॉक्टर प्रभावित भागात दौरा करून आपला अहवाल सादर करतील.
असे असले तरी चिकन, मटण खाल्ल्यामुळे कोरोना होत नाही असे तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. ‘कोरोना’चा प्रसार हा माणसापासून माणसात होतो. पक्षी-प्राण्यांपासून माणसाला ‘कोरोना’ची लागण होत नाही. त्यामुळे चिकन-अंडी, मटण, मासे बिनधास्त खा असे आवाहन मुंबई पशुवैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी नागरिकांना केले. ‘कोरोना’बाबत नाहक पसरवल्या जाणाऱया अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले.
‘कोरोना’बाबतच्या अफवांमुळे अनेक नागरिकांनी चिकन खाणे बंद केले आहे. त्यामुळे कोटय़वधीची उलाढाल असलेला पोल्ट्री व्यवसायही धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अजित रानडे यांनी अफवा आणि गैरसमजांचे निरसन मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केले. पक्षी-प्राण्यांपासून ‘कोरोना’ची लागण किंवा प्रसार झाल्याचे एकही उदाहरण नाही. चिकन-अंडी, मटण, मासे हे प्रोटीनचे सर्वोत्तम माध्यम आहे. मात्र सध्याच्या अफवांमुळे लोकांनी चिकन-अंडी खाणे बंद केल्याने नागरिक एका चांगल्या आहारापासून वंचित राहत असल्याचे ते म्हणाले.
























































