सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेचा धमाका 10 जानेवारीपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेसाठीचा लिलाव डोळ्यांसमोर ठेवून स्थानिक क्रिकेट मोसमातील स्पर्धेचा निर्णय घेतला. टी-20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱया हिंदुस्थानी खेळाडूंना फेब्रुवारीत होणाऱया आयपीएलच्या लिलावात चांगली बोली लागेल, हे लक्ष्य बीसीसीआयने डोळ्यांसमोर ठेवले. याच पार्श्वभूमीवर सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. ही स्पर्धा 10 ते 31 जानेवारीदरम्यान सहा राज्यांमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सहाही ठिकाणी स्पर्धेशी संबंधित असणाऱयांसाठी ‘बायो सिक्योर हब’ तयार करण्यात येणार आहे.

हिंदुस्थानातील स्थानिक क्रिकेट मोसम कोरोनामुळे यंदा पुढे ढकलण्यात आला. बीसीसीआयने संलग्न संघटनांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतरच सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी संघांना स्पर्धेच्या ठिकाणी 2 जानेवारीला पोहचावे लागणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यावेळी दिली.

प्रतिष्ठेची रणजी स्पर्धा रद्द होण्याची शक्यता

कोरोनाचा फटका हिंदुस्थानातील क्रिकेट मोसमाला बसला आहे. हिंदुस्थानातील स्थानिक क्रिकेट मोसम हा मार्च-एप्रिलपर्यंत सुरू असतो. त्यानंतर आयपीएलचे आयोजन केले जाते. बीसीसीआयने जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत आणखी एकच स्पर्धा बीसीसीआयकडून खेळवण्यात येऊ शकते. रणजी ही देशातील प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पण ही स्पर्धा प्रदीर्घ चालते. सध्या वेळेची कमतरता लक्षात घेता या मोसमात ही स्पर्धा होणार नसल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

खेळाडूंच्या मानधनाचे काय…

सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेचा साखळी फेरीचा टप्पा झाल्यानंतर या मोसमातील पुढच्या स्पर्धांच्या वेळापत्रकाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पण सध्याची परिस्थिती बघता विजय हजारे ट्रॉफी हीच स्पर्धा खेळवण्यात येऊ शकते. अशा परिस्थितीत फक्त स्थानिक क्रिकेटवर उदरनिर्वाह करणाऱया क्रिकेटपटूंचे काय होणार, असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे. जगातील धनाढय़ बोर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱया बीसीसीआयने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.