#Coronavirus सर्वात आधी कोणते लक्षण दिसते? जाणून घ्या कसा असतो लक्षणांचा क्रम

कोरोना विषाणूनच्या नव्या स्ट्रेनचा संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ सुरू आहे. यापासून हिंदुस्थानही वाचलेला नाही. हिंदुस्थानमध्ये सलग दोन दिवसांपासून दररोज 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळत असून 2 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत या विषाणूबाबत संशोधन झाले असून अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. याच्या लक्षणांबाबतही महत्वाची माहिती समोर आली आहे. विषाणू शरीरावर हळूहळू हल्ला चढवतो, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे विषाणूची लागण झाली आहे हे ओळखण्यासाठी लक्षणांचा क्रम कसा असतो हे माहिती असणे आवश्यक आहे. हा क्रम ओळखता आल्यास लवकरात लवकर उपचार घेऊन रुग्ण वेगाने बरा होऊ शकतो. याबाबत अधिक जाणून घेऊया…

पहिला दिवस

कोरोना संक्रमित होणाऱ्या 88 टक्के लोकांमध्ये पहिल्या दिवशी ताप आणि थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून आली आहेत. अनेक लोकांच्या स्नायूंमध्ये वेदना आणि कोरडा खोकला अशीही लक्षणे दिसली आहेत, असे चीनमध्ये झालेल्या एका अभ्यासातून समोर आले.

दुसरा ते चौथा दिवस

पहिल्या दिवशी ताप, थकवा, कोरडा खोकला, स्नायुंमध्ये वेदना अशी लक्षणे जाणवल्यानंतर दुसरा दिवस ते चौथा दिवस यामध्ये सलग ताप आणि कफ अशी लक्षणे दिसून आली आहेत.

पाचवा दिवस

कोरोनाची लागण झाल्यानंतर पाचव्या दिवशी रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. शक्यतो हे लक्षण वृद्धांमध्ये किंवा आधीपासून आजार असणाऱ्या लोकांमध्ये जास्त दिसून आले आहे. मात्र हिंदुस्थानमध्ये पसरलेल्या नव्या स्ट्रेनमध्ये तरुण रुग्णांमध्येही हे लक्षण दिसून आले आहे.

सहावा दिवस

सहाव्या दिवशी ताप आणि खोकला दिसून येतो. काहींना छातीमध्ये वेदना, छातीवर जड वस्तू ठेवल्यासारखे किंवा आत खेचल्यासारखेही लक्षण दिसले आहे.

कोरोनाची लस घेण्याआधी व घेतल्यानंतर काय काळजी घ्याल, ‘UNICEF’ची नियमावली नक्की वाचा

सातवा दिवस

सातव्या दिवशी छातीतील वेदना वाढत जातात आणि दबावही वाढतो. श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. ओठ आणि चेहरा निळा पडू लागतो. काहींना अशा वेळी रुग्णालयात दाखल करावे लागते. मात्र ज्यांमध्ये सौम्य लक्षणे आहेत त्यांची लक्षणे सातव्या दिवसापासून कमीही होऊ लागतात.

आठवा आणि नववा दिवस

चीनच्या सीडीसीच्या अहवालानुसार, आठव्या-नवव्या दिवशी जवळपास 15 टक्के कोरोना रुग्णांना ‘एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ जाणवू लागतो. अशा परिस्थितीत रुग्णाच्या फुफ्फुसात तरल पदार्थ जमा होऊ लागतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते.

दहावा आणि अकरावा दिवस

श्वास घेण्यास अडचण येऊ लागते आणि परिस्थिती अवघड होते. त्यामुळे रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करावे लागते.

बारावा दिवस

वुहानमधील अहवालानुसार, बहुतांश लोकांना बाराव्या दिवसानंतर ताप येणे बंद होते. मात्र काहींचा कफचा त्रास वाढत जातो, असेही दिसून आले आहे.

तेरावा आणि चौदावा दिवस

कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये तेराव्या आणि चौदाव्या दिवशी श्वास घेण्याचा त्रासही संपतो, असे निदर्शनास आले आहे.

…तर चिंतेची गोष्ट

लक्ष दिसल्याच्या पहिल्या दिवसापासून चौदाव्या दिवसापर्यंत कोरोना संक्रमित योग्य उपचारानंतर बरा होतो. मात्र लक्षण दिसल्यापासून अठराव्या दिवसापर्यंत तब्येत गंभीर असेल तर ही चिंतेची गोष्ट असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे, असे वृत्त ‘आज तक‘ने दिले आहे

कोरोनाची लागण झाल्यावर बहुतांश रुग्ण करताहेत ‘ही’ जीवघेणी चूक, आताच व्हा सावध

आपली प्रतिक्रिया द्या