कोरोनाची लागण झाल्यावर बहुतांश रुग्ण करताहेत ‘ही’ जीवघेणी चूक, आताच व्हा सावध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात सध्या भीतीदायक वातावरण आहे. नवीन स्ट्रेन अधिक आक्रमकपणे आणि वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास तीन लाखांच्या आसपास रुग्ण आढळले असून 2 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावरून हा विषाणू पसरण्याची तीव्रता लक्षात येते.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन प्रौढांसह लहान मुलं आणि तरुणांमध्येही वेगाने पसरत आहे. या दरम्यान कोरोनाची लागण झालेले काही रुग्ण गंभीर चुका करताना आढळून आले आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी काही लोक पेनकिलर्स आणि अँटिबायोटिक्सच्या गोळ्याही खात आहेत. मात्र हा प्रकार तुमच्या जीवावरही बेतू शकतो. त्यामुळे कोणत्याही गोळ्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका.

पेनकिलर्स

कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये डोकेदुखी आणि अंगदुखीसारखी लक्षणे दिसून येत आहेत. अशा काळात काही रुग्ण डॉक्टरांचा सल्ला न घेता पेनकिलर्स घेताना दिसताहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोळी घेऊ नका. याचा गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतो.

कफ सिरप

घशात खवखव होणे, खोकला येणे आणि सर्दीमुळे छातीत कफ होणे हे देखील कोरोनाचे लक्षण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने खोकल्यावरील औषध किंवा कफ सिरप घ्या. तसेच याचा ओव्हरडोस घेण्यापासून वाचा.

अँटिबायोटिक्स

अनेक जण कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर अँटिबायोटिक्स गोळ्यांचे सेवन करताना दिसून आले आहेत. मात्र हे चूक असून अँटिबायोटिक्स कोरोनावरील उपचार नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. याच्या ओव्हरडोसमुळे रिअॅक्शन होण्याचीच शक्यता जास्त आहे.

पारंपारिक औषधे

कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी काही लोक झाडपाला आणि पारंपारिक औषधांचेही सेवन करत आहेत. मात्र यास कोणतेही वैज्ञानिक प्रमाण नसल्याने कोणती गोष्ट किती प्रमाणात वापरावी आणि त्याचे सेवन कसे करावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

#Coronavirus ‘ही’ पाच लक्षणे आहेत जीवघेणी, दिसताच तात्काळ रुग्णालयात घ्या धाव

हे जरूर करा…

दरम्यान, ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, कोरोना महामारीच्या या काळात शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी योग्य आहार सुरू ठेवणे आवश्यक आहे. ताजी फळं, गरम जेवण, जीवनसत्वे आणि फायबरचे प्रमाण जास्त असणारा आहार असावा. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित रहावे यासाठी पाणी, ज्यूस यांचे सेवन करावे. फास्ट फू़ड, प्रोसेस फूड, तळलेले पदार्थ, अल्कहोल यापासून दूर रहावे.