
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सुरक्षित वातावरणात असलेले हिंदुस्थानचे क्रिकेटपटू नॉनस्टॉप क्रिकेट खेळत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेनंतरही त्यांचे धकाधकीचे वेळापत्रक सुरूच राहणार आहे. 28 मार्चला वन डे मालिका संपणार आणि 9 एप्रिलला आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा श्रीगणेशा होईल. दोन मालिकांमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंना फक्त चार दिवसांचा ‘ब्रेक’ अर्थातच सुट्टी मिळणार आहे. 2 एप्रिलपासून खेळाडूंना आयपीएलच्या सुरक्षित वातावरणात राहावे लागणार आहे.
थेट जोडले जाणार
हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील अखेरचा वन डे सामना 28 मार्चला असणार आहे. त्यानंतर आयपीएलमध्ये सहभागी होणाऱया हिंदुस्थानच्या खेळाडूंना वन डे मालिकेनंतर थेट आयपीएलशी जोडले जाता येणार आहे. बीसीसीआयच्या मेडीकल ऑफिसरकडून सर्व सुविधांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू थेट संघ मालकांच्या हॉटेल, बस व चार्टर्ड फ्लाइटमध्ये बसू शकणार आहेत.
कुटुंबासमवेत वेळ घालवू शकतात
हिंदुस्थानी संघातील बहुतांशी खेळाडू गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे ते बराच वेळ कुटुंबापासून दूर आहेत. अशा परिस्थितीत खेळाडूंना 29 मार्च ते एक एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत कुटुंबासोबत वेळ घालवण्याची मुभा बीसीसीआयकडून यावेळी देण्यात आली आहे. 2 एप्रिलपासून सर्व क्रिकेटपटूंना आयपीएलच्या सुरक्षित वातावरणात राहावे लागणार आहे अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.




























































