
सामना ऑलाईन । मुंबई
रेकॉर्डवरचा गुन्हेगार आणि एकेकाळचा डी. के. रावचा साथीदार टी. के. राजा याची हत्या करून पसार झालेल्या एकाला पकडण्यात वडाळा टी. टी पोलिसांना यश आले खरे पण राजाची हत्या करण्यात मुख्य भूमिका बजावणारा इम्रान मुल्ला हा अद्याप फरारी असून त्याचा सुगावा लागलेला नाही. इम्रान हाती लागल्यानंतरच राजाची हत्या का केली ते गुपित उघडकीस येणार आहे. वडाळा टी. टी. परिसरातील म्हाडा कॉलनीतल्या सूर्यनिवास इमारतीत भाड्याची खोली घेऊन राहणाऱ्या मरिमुथू देवेंद्र ऊर्फ टी. पी. राजा याची 7 डिसेंबर रोजी भरदुपारी निर्घृण हत्या करण्यात आली होती. दोघांनी चाकूचे वार तसेच डोक्यात गोळी झाडून राजाला ठार मारले होते. त्या आधी आरोपी जवळपास 45 मिनिटे राजाच्या घरात होते.
दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात राजाची हत्या करणारे त्याचेच नंबरकारी इम्रान मुल्ला आणि अमजद असल्याचे निष्पन्न झाले. वडाळा टी. टी. पोलिसांनी राजस्थानमध्ये गेलेल्या अमजदच्या मुसक्या आवळल्या पण इम्रान काही अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. इम्रान हा राजाचा एकेकाळी खास पंटर होता. दोघांनी अनेक गुन्हे एकत्र केले होते. त्यामुळे इम्रानने राजाचा खून का केला याबाबत अनेक तर्पवितर्क लढवले जात आहेत. इम्रानला कोणी सुपारी दिली की कुठल्या जुन्या रागातून ही हत्या करण्यात आली ते इम्रान हाती लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तूर्तास वडाळा टी. टी. पोलीस व क्राइम ब्रँचची पथके इम्रानचा शोध घेत आहेत.
























































