कॅरेबियन बेटांवर टी-20 वर्ल्ड कपचा थरार

2007 साली कॅरेबियन बेटांवर वन डे क्रिकेटचा वर्ल्ड कप खेळला गेला होता. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार रंगणार आहे. मात्र यंदा टी-20 क्रिकेटचा वर्ल्ड कप कॅरेबियन बेटांवरील सात देशांवर आयोजित केला जाणार आहे. यात ऑण्टिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, डॉमिनिका, गयाना, सेंट लुसिया, सेंट विन्सेंट आणि ग्रेनाडा, त्रिनिदाद आणि टोबॅगो या सात कॅरेबियन बेटांवर टी-20 वर्ल्ड कपसाठी 20 संघ भिडणार आहेत. येत्या 4 ते 30 जून 2024 दरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार असून एकूण 55 सामने खेळले जातील. तसेच काही सामने अमेरिकेतल्या डल्लास, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क येथे खेळविले जाणार असल्याची माहिती आयसीसीने दिली. या स्पर्धेचा कार्यक्रम आयसीसी वेळपूर्वीच जाहीर करेल, असाही विश्वास आयसीसी मुख्य कार्यकारी जेफ अलारडाइस यांनी व्यक्त केला. 2007 च्या वर्ल्ड कप आयोजनादरम्यान विंडीजला खूप मोठे नुकसान सोसावे लागला होते, मात्र यंदाची स्पर्धा विंडीज क्रिकेटला आर्थिकदृष्टय़ा नवसंजीवनी देणारी असेल.