T20 WC 2024 – हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; इसिसची धमकी, सुरक्षेत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

हिंदुस्थान पाकिस्तानमधील क्रिकेटचा सामना म्हणजे क्रीडाप्रेमीना पर्वणीच असते. या हाय व्होल्टेज लढतीकडे अवघ्या जगातील प्रेक्षकांचे लक्ष असते. मैदानातील हे द्वंद्व पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात. आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये हे दोन्ही संघ 9 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये हा सामना होणार आहे. मात्र या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेने हिंदुस्थान – पाकिस्तान लढतीवर हल्ला करण्याची खुलेआम धमकी दिली आहे. इसिस एक व्हिडीओ जारी करत हल्लेखोरांना या लढतीला लक्ष्य करण्याचे आवाहन केले आहे. यावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने मौन सोडले असून हिंदुस्थान – पाकिस्तान लढत होणाऱ्या मैदानावर आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

9 जून रोजी न्यूयॉर्कच्या नसाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर हिंदुस्थान – पाकिस्तान लढत होणार आहे. मात्र यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असून इसिस या दहशतवादी संघटनेने धमकी दिल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे. त्यामुळे CWI’S चीफ एक्स्यूटिक ऑफिसर जॉनी ग्रैवस यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून सर्व तपास पूर्ण झाल्याची माहिती दिली. खेळाडू आणि क्रीडा चाहते यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कोणतीही जोखीम घेऊन इच्छित नाही. आमचे पथक सातत्याने नजर ठेऊन आहे, असे त्यांनी सांगितले.

हम भी है जोश में! टीम इंडियाच्या सरावाला सुरुवात

इसिसने नुकतीच ब्रिटिश चॅटिंग साईटवर क्रिकेट मैदानाचा एक फोटो अपलोड केला होता. यावर हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान लढतीची तारीख 9/06/2024 लिहिलेली होती आणि वर ड्रोन उडत असल्याचे दाखवले होते. याबाबत एनबीसी न्यूयॉर्क टीव्हीने वृत्त दिल्यानंतर मैदानाची सुरक्षा वाढवण्यात आली.