T20 WC गुडघ्यावर बसण्यास दिला नकार, क्विंटन डिकॉकला आफ्रिकेने संघातून बाहेर काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूएईमध्ये आयसीसी टी-20 वर्ल्डकप सुरू असून वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना खेळवण्यात आला. हा सामना आफ्रिकेने 8 विकेट्सने जिंकला. मात्र आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा नियमीत यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक मैदानात दिसला नाही. डिकॉकला दुखापत झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र त्याच्या मैदानात न उतरण्यामागील कारण वेगळेच असल्याचे समोर आले आहे.

वर्ल्डकपमध्ये ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर’ ही मोहीम राबवली जात आहे. प्रत्येक लढतीच्या सुरुवातीला दोन्ही संघाचे खेळाडू गुडघ्यावर बसून या मोहिमेला समर्थन देत आहेत. मात्र आज वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीपूर्वी क्विंटन डी कॉक याने वैयक्तीक निर्णय घेत असे करण्यास नकार दिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने त्याला आज अंतिम 11 मध्ये स्थान दिले नाही.

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने टी-20 वर्ल्डकपच्या लढतींपूर्वी वंशभेदाविरोधातील ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर’ या मोहीमेत सहभागी होण्यास सांगितले होते. मात्र क्विंटन डी कॉक याने यास नकार दिला. त्यामुळे अंतिम 11 मध्ये त्याच्या जागी हेन्रिक क्लासेन याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून घेण्यात आले. तर रिज हेंड्रिक्स याची सलामीवीर म्हणून निवड झाली.

T20 WC पाकिस्तानचा विजय हिंदुस्थानसाठी ठरणार फायदेशीर, जाणून घ्या सेमीफायनलचे गणित

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने याबाबत म्हटले की, सामन्यापूर्वी सर्व खेळाडू गुडघ्यावर बसून या मोहिमेचे समर्थन करणार याबाबत सहमती झाली होती. दक्षिण आफ्रिकन इतिहास पाहता वंशभेदाविरुद्ध एकजूट आणि विरोध प्रदर्शन करणे आवश्यक आहे. मात्र डिकॉकने असे करण्यास नकार दिल्याने त्याला खेळवण्यात आले नाही. याबाबत टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिक याने ट्वीट करून माहिती दिली आहे.