…तर आमच्या देशात सामने आयोजित करा; नवी ऑफर देत T -20 विश्वचषकाच्या वादात पाकिस्तानची उडी

2026 ICC T 20 विश्वचषकाबाबत वाद सुरू असतानाच त्यात पाकिस्तानने उढी घेतल्याने वाद आणखी तीव्र झाला आहे. हिंदुस्थानात सामने खेळण्यास नकार देणारा बांगलादेश आयसीसीकडून प्रतिसादाची वाट पाहत आहे. त्यातच आमच्या देशात सामने आयोजित करा, अशी ऑफर देत आता पाकिस्तानने या वादात उडी घेतली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशी क्रिकेट संघाने विश्वचषक २०२६ सामने हिंदुस्थानात खेळण्यास नकार दिला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पत्र लिहून त्यांच्या संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्याची विनंती केली आहे. त्यावर आयसीसीने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून मुस्तफिजूर रहमानला मुक्त केल्यानंतर बीसीबीने हे पाऊल उचलले आहे.

आता पाकिस्तान वादात उतरला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) म्हटले आहे की जर श्रीलंका बांगलादेशच्या टी-२० विश्वचषक सामन्यांचे आयोजन करण्यास अनुपलब्ध असेल तर ते त्यांचे आयोजन करण्यास तयार आहे. हा दावा जिओ सुपरच्या अहवालात करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील सर्व मैदाने टी-२० विश्वचषक सामन्यांचे आयोजन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.पीसीबीने आधीच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता २०२५ सारख्या मोठ्या स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे आणि हे सामने सुरळीतपणे आयोजित करण्यास सक्षम आहे, असा दावा पाकिस्तानने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आयसीसीने अद्याप बांगलादेशचे सामने हिंदुस्थानबाहेर खेळवायचे की हिंदुस्थानातच खेळवायचे याचा निर्णय घेतलेला नाही. २०२६ च्या टी२० विश्वचषकसाठी बांगलादेशला गट क मध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्यांचा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. ९ आणि १४ फेब्रुवारी रोजी बांगलादेशचा सामना इटली आणि इंग्लंडशीही होईल. त्यानंतर बांगलादेशचा शेवटचा गट सामना १७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नेपाळविरुद्ध होईल. आता या सर्व घडामोडींवर आयसीसीचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.